कुठे फेडाल ही पापं?, संजय राऊत संतापले; कुणावर साधला निशाणा?

| Updated on: Sep 11, 2024 | 11:08 AM

"कायदा सर्वांसाठी समान हवा आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही", अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

कुठे फेडाल ही पापं?, संजय राऊत संतापले; कुणावर साधला निशाणा?
sanjay raut
Image Credit source: PTI
Follow us on

Sanjay Raut Criticises Devendra Fadnavis : महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर शहर हिट अँड रन प्रकरणामुळे हादरले आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात भरधाव वेगात आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात काही जण जखमी झाले. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ऑडी कारमुळे हा अपघात झाला त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावे आहे. हा अपघात झाला त्यावेळी गाडीत अर्जुन हावरे, रोनित चित्तमवार, संकेत बावनकुळे हे तिघेजण होते. ही गाडी संकेतचा मित्र अर्जुन चालवत होता. याप्रकरणी अद्याप कोणतीही कडक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. “तो कोणाचाही मुलगा असेल? कायदा सर्वांसाठी समान हवा आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही”, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

“कायदा सर्वांसाठी समान हवा”

“नागपुरात झालेला अपघात जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने केला असता, तर काय झालं असतं त्याचा विचार करा. एव्हाना पोलिसांनी त्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला पकडून, त्याच्या मित्राला धरुन धिंड काढली असती. सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो. मी तो कुणाचा मुलगा आहे, हे मानत नाही. तो कोणाचाही मुलगा असेल? कायदा सर्वांसाठी समान हवा आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

“कायदा-सुव्यवस्थेच्या गोष्टी करत आहात?”

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात केली जाईल. असा गृहमंत्री महाराष्ट्राला कधीही लाभला नाही. नागपुरात त्यांच्या नाकासमोर इतका मोठा अपघात झाला. १७ ते १८ लोक रुग्णालयात आहेत आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे, त्याचं साधं नावं देखील त्याचं एफआयआरमध्ये नाही. जी व्यक्ती प्रत्यक्ष गाडी चालवत होती आणि नंतर त्या व्यक्तीला बदलण्यात आलं, त्याला वाचवताय, तुम्ही कसल्या कायदा-सुव्यवस्थेच्या गोष्टी करत आहात? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ज्याप्रकारे तुम्ही गृह खातं चालवत आहात, तुम्ही अनिल देशमुखांना अटक करायला निघाला आहात. पण तुमच्या पक्षातील एका नेत्याने दहा गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही अभय देताय, ही पापं कुठे फेडाल?” असा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.