Sanjay Raut On Devendra fadnavis : ‘मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांनी केले होते. या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. “उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांनी स्वत:ची तुलना अभिमन्यूशी करु नये. तो खरोखर योद्धा होता. प्रामाणिक होता. त्याला स्वत:चे विचार आणि भूमिका होत्या, असं काही फडणवीसांकडे आहे का?” असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी “देवेंद्र फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढायला हवा. महाराष्ट्र लुटायला दिल्ली आणि गुजरातमधून जे नवीन औरंगजेब येतात, त्यांनी त्यांच्यावर चित्रपट काढला तर नक्की त्यांची चर्चा होईल”, असे म्हटले.
“सध्या तुम्ही चक्रव्ह्यूमध्ये अडकले आहात. चक्रव्ह्यूमध्ये योद्धे अडकतात, बेईमान नाही. त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा आणि अभिमन्यूचा इतिहास त्याचे कुटुंब, त्याचे कौशल्य हे वादातीत होते. फडणवीसांनी स्वत:ची तुलना अभिमन्यूशी करु नये. तो खरोखर योद्धा होता. प्रामाणिक होता. त्याला स्वत:चे विचार आणि भूमिका होत्या, असं काही फडणवीसांकडे आहे का? हातात खोटी रिव्हॉलवर घेतले आणि सिंघम म्हणून स्वत:चे पोस्टर लावले म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
त्यासोबतच संजय राऊत यांनी बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुनही देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. “काल कोरेगाव पार्कला अजून एक अत्याचाराची घटना घडली. कोरेगाव पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलावर बलात्कार झाला. हे जे सो कॉल्ड सिंघम आहेत, ते त्यांचं एन्काऊंटर करणार आहेत का? नालासोपाऱ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केलाय, हे जे सिंघम आहेत, ते त्यांचा एन्काऊंटर करणार आहेत का? राजकीय फायद्यासाठी जे कोणाला तरी वाचवण्यासाठी जे अशाप्रकारे एन्काऊंटर करतात, त्यांनी स्वत:ला योद्धा किंवा अभिमन्यू समजू नये. तो महाभारताचा अपमान ठरवला जाईल”, असेही संजय राऊत म्हणाले.
एकच गोष्ट सांगतो यांना वाटतंय हे माझ्या विरोधात चक्रव्यूह तयार करत आहेत. मात्र त्यांना एकच सांगणार आहे की तुम्ही (विरोधक) चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे. काहीही झालं तरीही माझा अभिमन्यू होणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. टीव्ही 9 मराठी कॉनक्लेवमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होते.