“बांगलादेशातील हिंदूंची चिंता, पण ‘लाडक्या बहिणीं’ सुरक्षेवर…”, संजय राऊताचा घणाघात

| Updated on: Aug 26, 2024 | 11:17 AM

निवडणुका होईपर्यंत या राज्यात दोनेक महिने सगळेच लाडके होतील. या लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे व उद्या कर्मचाऱ्यांचे पगारही करता येणार नाहीत, अशी चिंता संजय राऊतांनी व्यक्त केली.

बांगलादेशातील हिंदूंची चिंता, पण ‘लाडक्या बहिणीं’ सुरक्षेवर..., संजय राऊताचा घणाघात
संजय राऊत, एकनाथ शिंदे
Follow us on

Sanjay Raut Criticism Ladki bahin yojana : राज्यात विधानसभा निवडणुकीच वारे वाहू लागले आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेवरुन सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. “महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता. लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व 1500 रुपयांत बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे”, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “निवडणुका होईपर्यंत या राज्यात दोनेक महिने सगळेच लाडके होतील. या लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे व उद्या कर्मचाऱ्यांचे पगारही करता येणार नाहीत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“लाडकी बहीण योजनेच्या प्रचार सभा राज्यात जागोजागी होत आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोंधळ होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एका महिला मेळाव्यात मुख्यमंत्री मिंधे हे महिलांना सारखे विचारत आहेत, ‘‘पैसे मिळाले ना? मिळाले ना पैसे? पैसे मिळाले ना?’’ यावर समोरच्या गर्दीतून एक महिला जोरात ओरडली, ‘‘होय होय, मिळाले. पैसे काय खोकेवाल्या सरकारच्या बापाचे आहेत काय?’’ महिलांच्या मनातला हा उद्रेक आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले.

इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता

“‘लाडकी बहीण’ योजनेवर विनोदही खूप चालले आहेत व जनता त्या विनोदाची मजा घेत आहे. यवतमाळमध्ये ‘लाडकी बहीण’ कार्यक्रमात गोंधळ झाल्याने मुख्यमंत्री मिंधे यांना भाषण थांबवावे लागले. यवतमाळमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम सुरू असताना अजित पवार-फडणवीस यांची भाषणे आटोपली व मुख्यमंत्री मिंधे भाषणासाठी उभे राहिले. भाषण सुरू होताच महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. अर्ज भरूनही आम्हाला पैसे मिळाले नाहीत, अशा घोषणा त्या महिला देऊ लागल्या.

त्यामुळे मुख्यमंत्री मिंधे यांना भाषण थांबवून त्या महिलांची समजूत काढावी लागली. ‘‘पैसे मिळतील, पैसे मिळतील’’ असे वारंवार सांगावे लागले.‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत. प्रेक्षकगृहातील महिलांकडून मुख्यमंत्र्यांवर गुलाबी पाकळय़ा उधळून घेतल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता”, असा घणाघातही संजय राऊतांनी केला.

‘लाडक्या बहिणीं’वरील अत्याचार त्यांना अस्वस्थ करत नाहीत

“लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व 1500 रुपयांत बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे. मुख्यमंत्री मिंधे 1500 रुपये वाटत फिरत आहेत, तर पंतप्रधान ‘लखपती दीदी’ योजनेसाठी काल जळगावात येऊन गेले. हे खरे असले तरी बहिणी-दीदींच्या सुरक्षेवर कोणीच बोलायला तयार नाही. बांगलादेशातील हिंदूंची त्यांना चिंता वाटते, पण महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’वरील अत्याचार त्यांना अस्वस्थ करीत नाहीत”, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी

“लाडके भाऊ बेरोजगार आहेत. त्यांना काय मिळणार? त्यांना कोण देणार? महायुतीत सरकारकडे एक लाडका मुलगा आहे व एक लाडकी मुलगी आहे. हा लाडका मुलगाच सध्या ‘वर्षा’ बंगल्यावरून राज्याच्या प्रशासनास धमक्या देत राज्य चालवीत आहे. निवडणुका होईपर्यंत या राज्यात दोनेक महिने सगळेच लाडके होतील. या लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे व उद्या कर्मचाऱ्यांचे पगारही करता येणार नाहीत. बेरोजगार तरुणांना त्यांचे मोबाईल फोन रिचार्ज करणे कठीण झालेय”, असेही संजय राऊतांनी म्हटले.