बावनकुळे कानाचं ऑपरेशन करून घ्या; संजय राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात जुंपली

| Updated on: Aug 23, 2024 | 11:50 AM

तुमची यंत्रणा कुचकामी आहे. राज्यातील पोलीस महासंचालिका महिला आहे. त्या संघाची कार्यकर्ती आहे असं सांगत असेल तर काय अपेक्षा करता? महाराष्ट्रातील अनेक पोलिसांना त्यांची पार्श्वभूमी संघाची आहे का हे पाहून नेमणुका दिल्या आहेत. ही जर कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची क्वॉलिफिकेशन असेल तर इतर पोलिसांत नाराजी पसरणारच. संपूर्ण राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचाराने बरबटलं आहे. पैसे दिल्याशिवाय बदल्या होत नाही, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

बावनकुळे कानाचं ऑपरेशन करून घ्या; संजय राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात जुंपली
संजय राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात जुंपली
Follow us on

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे आसूसले आहेत. उद्या शरद पवार यांनी मला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणतील, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला होता. बावनकुळे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. बावनकुळे यांनी एकदा कान साफ करून घ्यावेत. किंवा कानाचं ऑपरेशन तरी करून घ्यावं. उद्धव ठाकरे काय म्हणाले ते नीट ऐका आणि मगच बोला, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

चंद्रशेखर बावनकुळे ही राजकारणातील वाया गेलेली केस आहे. त्यांच्या लोकसभा निवडणुकीत नागपुरातील कामठीत भाजप 30 हजाराने मागे होता. तेव्हापासून बावनकुळे यांच्या मनावर परिणाम झाला आहे. आम्हाला कुणाचीही याचना करावी लागत नाही. निवडणुकीत चेहरा असावा असं आमचं म्हणणं आहे. बावनकुळेंनी कान साफ करून घ्यावेत, चौपाट्यावर कान साफ करणारे लोकं असतात. बावनकुळेंना तिकडे पाठवू आम्ही, असं संजय राऊत म्हणाले.

हे सर्वांना माहीत आहे

काँग्रेसने त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे स्वत: विषयी बोलले नाहीत. बावनकुळेंना ऐकता येतं का? ते बधीर झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कुणीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार द्यावा मी त्याला पाठिंबा देईन असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे जर बावनकुळेंना ऐकून येत नसेल तर त्यांनी कानाचं ऑपरेशन करून घ्यावं, असा हल्ला चढवतानाच चेहरा असल्याशिवाय निवडणुकीला जाता येत नाही हे सर्वांना माहीत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

सुरक्षेची गरज नव्हती

शरद पवार यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल शरद पवार यांना केंद्र सरकारने सेक्युरिटी दिली आहे. खरंतर सुरक्षा देण्याची गरज नव्हती. याचा अर्थ महाराष्ट्राच्या पोलिसांवर गृहमंत्र्यांना विश्वास नाही. महाराष्ट्रात तुमचं शरद पवारांना केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे. 50-60 सीआरपीएफ जवान शरद पवारांसोबत राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस मुलींचं रक्षण करू शकत नाही, तसं नेत्यांचं रक्षणही करू शकत नाही, यावर सरकारने मोहर उमटवली आहे. पोलीस कुचकामी आहे हे तुम्ही सिद्ध केलंय, अशी टीका त्यांनी केली.

हा पोलिसांचा अपमान

बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा उच्च शिखरावर होते. तेव्हाही त्यांना आयबीकडून इशारे दिले जायचे. जीवाला धोका असल्याचं सांगितलं जायचं. ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो आपला पराभव करू शकतो, त्याला अडकून ठेवायचं, त्याच्या मनावर दबाव आणायचा, त्याची इत्थंभूत माहिती घ्यायची यासाठी सुरक्षा व्यवस्था दिली जाते. तरीही केंद्राने सुरक्षा दिली, हा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचा अपमान आहे, असंही ते म्हणाले.