“56 इंच छातीवाले कुठे आहेत?” संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल, म्हणाले “अत्याचार झाल्यावर…”

| Updated on: Aug 25, 2024 | 8:29 AM

"बदलापूर प्रकरणातील नराधम हा हिंदूच आहे व जेथे अत्याचार झाला ती शिक्षण संस्था हिंदुत्ववाद्यांची आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. कारण संस्था भाजपवाल्यांची होती, अशा थेट आरोप संजय राऊतांनी केला.

56 इंच छातीवाले कुठे आहेत? संजय राऊतांचा रोखठोक सवाल, म्हणाले अत्याचार झाल्यावर…
Follow us on

Sanjay Raut On Badlapur School Rape Case : “बदलापुरातील दोन लहान मुलींवर शाळेतच अत्याचार झाले. शाळेचे पालकत्व भाजपशी संबंधित व्यक्तीकडे आहे. जर ही संस्था काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असती तर एव्हाना देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महिला मंडळाने बदलापुरात जाऊन शाळेच्या पायरीवर फतकल मारली असती, पण आज ते बलात्कारावर वेगळेच प्रवचन झाडत आहेत”, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊतांनी भाजप सरकारवर घणाघात केला. यावेळी संजय राऊतांनी देशभरात सुरु असलेल्या महिला अत्याचाराच्या प्रकरणावर भाष्य केले. त्यासोबत या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी महिला सुरक्षेबद्दल प्रश्नही उपस्थित केला. 56 इंच छातीवाले कोठे आहेत? असा रोखठोक सवालही संजय राऊतांनी विचारला.

भाजपचे महिला मंडळही शांतच

“महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण, विटंबना सुरू असताना दरबारातील सगळेच 56 इंच छातीवाले खाली मान घालून बसले होते. आज भारतातील लेकी, सुना, महिलांच्या बाबतीत तेच घडत आहे. बदलापुरातील लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण अस्वस्थ करणारे आहे. याप्रकरणी भाजपचे महिला मंडळही शांतच आहे. गृहमंत्री फडणवीस सारवासारवी करीत आहेत. का? कोणासाठी?” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

शाळेचे पालकत्व भाजपशी संबंधित व्यक्तीकडे

हिंदुस्थानात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. कायदा व सुव्यवस्था ढेपाळत आहे आणि देशाचे गृहमंत्री शहा हे बांगलादेशातील हिंदूंची संख्या कशी घटली यावर भाषणे देत देशाचा छळ करीत आहेत. असे राज्यकर्ते लाभल्यावर देशातील महिलांची सुरक्षा बदलापूर, हाथरस, उन्नावच्या चव्हाट्यावरच येणारच. बदलापुरात जनता रस्त्यावर उतरली. जनतेचा उद्रेक गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचला असेलच. बदलापुरातील दोन लहान मुलींवर शाळेतच अत्याचार झाले. शाळेचे पालकत्व भाजपशी संबंधित व्यक्तीकडे आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या हुकुमाने अत्याचार झाले असा होत नाही. पण ही संस्था काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असती तर एव्हाना देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महिला मंडळाने बदलापुरात जाऊन शाळेच्या पायरीवर फतकल मारली असती, पण आज ते बलात्कारावर वेगळेच प्रवचन झाडत आहेत, अशा घणाघातही संजय राऊतांनी केला.

ती शिक्षण संस्था हिंदुत्ववाद्यांची

बलात्कार, विनयभंग, महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे व त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. बलात्कार करणारा मुसलमान असेल तर हिंदू समाजाला भडकवून रस्त्यावर उतरवले जाते. `लव्ह जिहाद’च्या नावाने आरोळ्या ठोकल्या जातात. उरण येथील यशश्री शिंदेवर अत्याचार करणारा मुसलमान होता. त्याविरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले, पण बदलापूर प्रकरणातील नराधम हा हिंदूच आहे व जेथे अत्याचार झाला ती शिक्षण संस्था हिंदुत्ववाद्यांची आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. कारण संस्था भाजपवाल्यांची होती, अशा थेट आरोप संजय राऊतांनी केला.

गृहमंत्री फडणवीस भाजपचेच. फडणवीस अशा प्रकरणात अनेकदा बोलले आहेत, “मलाही मुलगी आहे.” पण गृहमंत्री महोदय, तुमच्या मुली सुरक्षित आहेत. गरीब, मध्यमवर्गीयांच्या मुली वाऱ्यावर आहेत. त्यांच्यावर अत्याचार झाल्यावर तुमचे पोलीस संरक्षण देत नाहीत. कारण अत्याचार करणारे तुमचे समर्थक आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.