मुंबई : “देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत. आमचा नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध नाहीय. संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घ्यावं, ही आमची भूमिका आहे. आमचा मुद्दा संवैधानिक आणि नैतिक आहे. देशाच्या घटनेवर संविधानावर हल्ला होतोय याला आमचा विरोध आहे” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी नकुतेच तीन देशाच्या दौऱ्यावरुन परतले. पापुआ गिनीया या आश्चर्यकारक देशात जाऊन आले. त्यांनी आता या विषयात लक्ष घालावं. राष्ट्रपती भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करावं व या सर्व वादावर पडदा घालावा” असं संजय राऊत म्हणाले.
‘देशाच्या राष्ट्रपतींना बोलवत नाही, तिथे आमचं काय?’
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे विधान परिषदेत दोन तास थांबत नाहीत, त्यांना दिल्लीला कोण बोलवणार? या टीकेला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “सध्या लोकशाहीवादी, देशभक्तांना दिल्लीत बोलावल जात नाही. चमचे, चाटूगिरी करणारे आणि मोदींच भजन करणाऱ्यांना दिल्लीला बोलावल जातं. देशाच्या राष्ट्रपतींना बोलावल जात नाही, तिथे आमचं काय?” असं संजय राऊत म्हणाले.
गद्दारांची गाडी चालवण्याची फडणवीसांवर वेळ
“राष्ट्रपतींच्या सहीने संसद सुरु होते. लोकशाही भूमिका ठरवण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. त्या संविधानाच्या प्रमुख आहेत” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकण्याची वाईट वेळ आलेली नाही. बाळासाहेबांनी कधीच व्यक्तीला विरोध केला नाही. भूमिकेला विरोध केला. देवेंद्र फडणवीस गद्दारांच्या गाड्या चालवतायत काय वाईट वेळ आलीय” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.