अमित शाहांनी मणिपूर, काश्मीरमध्ये जायला पाहिजे. पण महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार बसवलं आहे, त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शाह इथे येतात. अमित शाह किंवा मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते. राज्यातला एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा महत्वाचा भूखंड अडाणींच्या घशात जाईल, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत मोदी, शाहांवर टीकास्त्र सोडलं. तसंच सध्याचं सरकार बैलपुत्र आहे, त्यांचा बाप बैल आहे. त्यामुळे त्यांची बुद्धीही बैलाची अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली. देशी गायीला राज्य माता दर्जा देण्यावरून विचारलेल्या प्रश्नासंदर्भात बोलताना राऊत यांनी हा टोला लगावला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने काल एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. कॅबिनेटच्या बैठकीत देशी गायींना राज्य मातेचा दर्जा देण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्वीकारून तातडीने जीआरही काढण्यात आला. याच मुद्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
गाईला राज्यमाता करून तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार ?
काही लोक तैलबुद्धीचे असतात, काही बैलबुद्धीचे असतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दुसरं काही काम नाहीये. आम्ही गोमातेला मानतो. पण भाजपशासित राज्यांमध्ये गोमातेच्या ज्या कत्तली होतात, गोमांस भक्षण होतं, गोव्यामध्ये , अरूणाचल प्रदेशमध्ये गोमांस विक्रीवर बंदी नाही, त्याबद्दल यांची भूमिका काय असा सवाल राऊत यांनी विचारला.
गाईला राज्यमाता करून तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार ? खरंतर गाईच्या दुधाला भाव द्या , शेतकऱ्यांचा जो दुधाच्या भावासाठी संघर्ष चालला आहे, त्याच्यावर चर्चा करा. पण ज्यांची बुद्धी बैलाची आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. असे फंडे निवडणुकीसाठी असतात. दिल्लीतून काही बैल येत असतात, काही केंद्रातून फिरत असतात, महाराष्ट्राचा त्यांनी बैल बाजार केलेला आहे. गाईची पूजा आम्ही सर्व करतो त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नाही , असे ते म्हणाले.
अमित शाह, मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते
केंद्रीय गृहमंत्री आज मुंबई दौऱ्यावर येणार असून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यात येणार आहे. त्यावरही राऊत यांनी टिपण्णी केली.’ ते (अमित शाह) देशाचे गृहमंत्री आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून गृहमंत्री महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शाखा शाखांना भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे यातून दिसतंय . खरं म्हणजे ते मणिपूरला गेले पाहिजेत, कश्मीरमध्ये जे अतिरिके हल्ले सुरू आहेत तिथे जाऊन त्यांनी थांबायला पाहिजे. चीन अरुणाचल च्या सीमेवर जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी, पण महाराष्ट्रातील निवडणुका आणि महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार त्यांनी बसवलेल आहे त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा इथे येत आहेत’.
‘ अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रात आले कि आम्हाला भीती वाटते, काही तरी इथला उद्योग राज्याबाहेर जाईल किंवा एखादा भूखंड अदानी च्या घशात जाईल त्याची तयारी करायला हे लोक येतात का ? अमित शहा आज येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर मिठाघराची जमीन अदानी ला देण्याचा निर्णय झाला त्या जमिनीच मोजमाप करायला ते येत आहेत का?, कि व्यवहार पाहायला ? भाजप चे नेते इथे आले कि महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल ‘ असा टोला त्यांनी हाणला.
लोकमत मोदींच्या विरोधात
‘ महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुदा देशाची राजधानी महाराष्ट्रात भरवतील असं मला वाटतं. मोदी आणि शहा यांना सारखं सारखं इथे यावं लागतंय याचा अर्थ लोकमत त्यांच्याशी विरुद्ध आहे, त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय म्हणून त्यांच्याशी हातात काहीतरी राहावं यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. पुण्यात एकाच मेट्रोचं उद्घाटन त्यांनी 6 वेळा केलंय, अमित शहा गृहमंत्री असुन वॉर्डावॉर्डात जाऊन बैठकी घेत आहेत याचा अर्थ राज्यातला भाजप कुचकामी आहे, फडणवीस पासून इतर सर्व नेते कुचकामी आहेत . त्यांनी इथे जी लोक इथे सत्तेवर बसवले ते कुचकामी आहेत, लोक त्यांना फेकून देणार आहेत’ असे राऊत म्हणाले.