सरकार वर ८ लाख कोटींच कर्ज आहे. ही काही छोटी-मोठी रक्कम नाहीये. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर या सरकारने नव्या नव्या यजना आणल्या. लाडकी बहीण ही योजना तर मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी आहे. आता लाडका भाऊ आणली आहे. लाडक्या भावांना ६ हजार आणि १० हजार रुपये देणार, आणि लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये ? लाडक्या बहिणीला पण १० हजार रुपये द्या, तरच त्याचं घर चालेल. 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालणार कसं? अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या योजनांवर कडाडून टीका केली.
खरी गरज लाडक्या बहिणींना आहे . त्या घर चालवतात. अनेकींच्या घरात नवरा,भाऊ बेरोजगार, नोकऱ्या नाहीत. आज एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25000 सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली या महाराष्ट्राची स्थिती आहे, हे सगळे लाडके भाऊ आहेत. त्यानाही दहा- दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात सुद्धा दहा हजार रुपये टाका पंधराशे रुपयांनी काय होतं, पंधराशे रुपयात मुख्यमंत्र्यांचे घर चालेल का ? असा सवाल राऊत यांनी विचारला. लाडक्या बहिणीवर अन्याय का करता ? आमची भूमिका आहे. लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये द्या, लाडक्या भावाला ही दहा हजार रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता महाराष्ट्रात आहे, हे दाखवून द्या, असं राऊत म्हणाले.
पवार नटसम्राट, भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार
शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत तर छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहेत, त्यांनी चित्रपटात देखील काम केलेलं आहे. खूप वेळा आपलं रंग रूप बदलून एक नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ माहीर आहेत. छगन भुजबळ का गेले,कशासाठी गेले,त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहित आहे.
पण शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत, त्यांना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रात एक खुला रंगमंच आहे, ते फिरत राहत, छगन भुजबळ यांसारखे जे नेते आहेत ते फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत असा टोला राऊत यांनी हाणला.
विधानसभेत मविआचाच विजय होणार
लोकसभा निवडणुकीत आम्हाला दहा जागा सुद्धा मिळणार नाही हे महायुती म्हणत होती पण आम्ही 31 जागा जिंकल्या आहेत. तर चार जागा आम्ही खूप कमी मतांनी हरलो,विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी 280 जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.