भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर सर्वात मोठं आक्रमण केलं आहे. मुघलांनंतर भाजपने केलेलं हे आक्रमण सर्वांत मोठं होतं, असं म्हणत शिवसेना ( उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली. आमची शिवसेना खरी असं म्हणणाऱ्यांनी स्वत:ला आरशात पहावं, असा टोला राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.
रवींद्र वायकर यांच्यावरही राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. वायकर हे आधी शिवसेनेत होते. ३-४ वेळा बीएमसीमध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. मंत्रीही झाले. उद्धव ठाकरेंचे ते निकटवर्तीय होते. पण तेच वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरून पळाले. पण आम्ही घाबरलो नाही. जेल, तुरूंग , कारवाई आम्ही कशालाच घाबरलो नाही, शिवसेनेतेच थांबलो. वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला अशा शब्दात राऊत यांनी वायकरांवर हल्लाबोल केला. ते आम्हाला काय शिकवणार ? वायकर हे काही लोकसभेत जाणार नाहीत, तो सगळा बोगस कारभार आहे, असेही राऊत म्हणाले.
जिथे ठाकरे तिथेच शिवसेना
शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त शिंदे गटाकडून मातोश्री परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून मातोश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून त्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचं बांद्रा इथे शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. त्याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी खडेबोल सुनावले.
हा एक हास्यास्पद प्रकार आहे असे म्हणत जिथे ठाकरे तिथेच शिवसेना असा ठाम पुनरुच्चार त्यांनी केला. 58 वर्षांपूर्वी हिंदहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची ही शिवसेना मुंबईसह महाराष्ट्रात आणि दिल्लीत निरंतर काम करत आहे. तेव्हापासून माझ्यासारख्या लाखो लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेतला. तो कोणी खाली ठेवला नाही. आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो, तुरूंगवास भोगला. पण आम्ही पक्षाशी ईमान कायम ठेवलं. आजही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्याच जोमाने काम करत आहे, ठामपणे उभी आहे.
पण कोणी म्हणत असेल की आमचीच शिवसेना खरी तर त्यांनी स्वत:ला आरशात पहाव, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. बाळासाहेबांची शिवसेना कुठे होते, याचा त्यांनी विचार करावा. पैशांनी मतं विकत घेणार, वायकरांसारख्या विजयाची चोरी करणं याला जनाधार म्हणत नाहीत. आणि आपला पक्ष जो गट आहे, तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी-शहांच्या चरणांशी ठेवणं याला जनाधार, विचारधारा म्हणत नाहीत, असे राऊत यांनी सुनावले.
लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं तरी तो वाघ होत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे हेच करत आहेत. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे शिंदे मिंधे, मधून उपटले कुठून ? हे जे उपटे आहेत, त्यांना यांना भाजपने आणलं, हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची ही कारस्थानं आहेत. शिवसेना अशा प्रकारे फोडणं हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठा आक्रमण आहे. मोघलांनंतर सर्वात मोठं आक्रमण मोदी शहा यांनी केलं. राज्यात पैशाच्या ताकदीवर पाच सहा जागा जिंकल्या म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांचे होत नाही, असा हल्ला राऊत यांनी चढवला.