Sanjay Raut : तू राहशील किंवा मी राहीन म्हणणाऱ्या उद्वव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, राऊत म्हणाले..

| Updated on: Dec 18, 2024 | 10:24 AM

एकतर तू राहशील किंवा मी राहीन, असं उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. आणि काल त्याच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली, याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. त्याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला

Sanjay Raut : तू राहशील किंवा मी राहीन म्हणणाऱ्या उद्वव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, राऊत म्हणाले..
संजय राऊत
Follow us on

एकनाथ शिंदे असोत की अजित पवार , त्यांना आत्तापासूनच जी वागणूक मिळत्ये ती पाहता भविष्यात त्यांचे पक्ष राहतील की नाही ही शंका सगळ्यांना आहे. संघ मुख्यालयात, रेशीमबागेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे. आता यापेक्षा दोन पक्षाचं आणखी अध:पतन काय राहिलं आहे ? दिल्लीत त्यांचं बौद्धिक घेतलं जातचं आहे, आता नागपुरातसुद्धा हे बौद्धिकाला उपस्थित राहणार असतील तर आनंद आहे. त्यांनी (अजित पवार , एकनाथ शिदे) यांनी त्यांचा पक्ष आता फक्त ( भाजपमाध्ये) विलीन करणंच बाकी आहे अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिदे, पवारांवर निशाणा साधला.

प्रत्येक पक्षामध्ये मग तो भाजपा असो किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, सगळीकडे रडारड सुरूच आहे. कुठे रडारड आहे, कुठे आदळआपट सुरू आहे. छगन भुजबळ यांच्यासारखा नेता , ज्याने अजित पवार यांचा गट स्थापन करण्यामध्ये भूमिका बजावली, महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नावर एक भूमिका मांडली, आज ते काय रडत आहेत ? कोण दादा, कसला वादा ? असा सवाल ते करत आहेत. या टोकापर्यंत भांडणं पक्षापक्षात सुरू आहेत. शिंदे गटात ज्यांना मंत्रीपदं मिळाली नाहीत, त्यांच्याकडे निष्ठा वगैरे काही दिसत नाही. काही लोक बॅगा भरून निघून गेली. मूळ शिवसेना पक्षामध्ये असं कधीच चाललं नाही आणि असं घडवण्याचा प्रयत्न केला नाही, असे राऊत म्हणाले.

ठाकरे -फडणवीस भेटीवर काय म्हणाले राऊत ?

एकतर तू राहशील किंवा मी राहीन, असं उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. आणि काल त्याच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली, याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. त्याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी थेट उत्तर दिलं. काय म्हणाले राऊत ?

महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहेत. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत, विधीमंडळाचे सदस्य आहेत. ते नागपूरला गेले होते. प्रचाराच्या व्यासपीठावर ज्या तोफा असतात, त्या आता थंड पडल्या आहेत. राज्यात आता नवीन सरकार आता स्थापन झालंय, त्यांनी उत्तम प्रकारे राज्याच्या हिताचं काम करावं, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या कल्याणाचं काम करावं अशा शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री हे विद्यमान मुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर त्यात मोठी खळबळ माजण्यासारखं कारण नाही. देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी राज्याच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या शुभेच्छा घेतल्या होत्या.

कालच्या भेटीनंतर ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी टीका होत आहे, त्यालाही राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं. तु्म्ही असं कोणतं हिदुत्व धरून ठेवलंय ? असा सवाल त्यांनी विचारला. मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने कधीही आपल्या मूळ विचारांपासून फारकत घेतलेली नाही. जे असे विचार मांडतात, त्यांची आम्हाला कीव येते.

बांग्लादेशमधील हिंदूवर होणार हल्ले असोत की सावरकरांचा विषय असो, दादरच्या हनुमान मंदिराचा विषय असो, याबाबत भूमिका मांडण्यासाठी आम्हीच पुढे आलो ना, इतर कोणी पुढे आलं का ? असा खड़ा सवाल राऊतांनी विचारला. दादर जवळील हनुमान मंदीरावर बुलडोझर चालवला तेव्हा आम्ही तिथे उभे राहिलो.

एक देश एक निवडणूकीवर राऊत म्हणाले..

आम्ही आमची भूमिका कधी बदलत नाही. भारतीय जनता पक्षाने जरी वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर विजय प्राप्त केला असला तरी बहुमतापेक्षा आकडा त्यांच्याकडे कमी आहे. 272 चं बहुमत असतानाही 269 वर ते थांबले, हा त्यांचा नैतिक पराभव आहे. त्याचा अर्थ असा की भाजपच्या वरिष्ठांचे व्हीप न पाळण्याची हिंमत हळूहळू स्वाभिमानी भाजपा खासदारांकडे येताना दिसत आहे. हीच हिंमत भविष्यकाळात नरेंद्र मोदींना याच कार्यकाळात सत्तेवरून उलथवून टाकेल, असं राऊत म्हणाले.

काल अमित शाह यांनी भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल ज्या पद्धतीने भाषण केलं, तुम्ही संविधानावर चर्चा करताना, संविधानावरच बोला, देशाच्या परिस्थितीवर बोला. 70 वर्षांपूर्वी नेहरूंनी काय केलं आणि काय केलं नाही याचं दळण तुम्ही किती काळ दळणार आहात ? तुमच्याकडे स्वत:चं काही बोलण्यासारखं आहे की नाही, पंडित नेहरू इतेक महान नेते होते, भारतीय जनता पक्षाला त्यांच्याविषयी असूया आहे, असा आरोप राऊत यांनी केला. आपण नेहरूंसारखं होऊ शकलो नाही, त्यांच्यासारखं मोठं काम करू शकलो नाही, आजही लोकं नेहरू, नेहरू करतात, याबद्दल त्यांना (भाजपा) असूया वाटते असं राऊत म्हणाले.