ज्या देशात मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे भ्रष्टाचाराविरोधा, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना न्याय कसा मिळेल ? हे अपेक्षित होतं, असं संजय राऊत म्हणाले. तरीही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो, असे त्यांनी नमूद केले. अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रकरणी आम्ही वरच्या न्यायलयात अपील करू, सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले संजय राऊत ?
मीरा-भाईंदर भागात युवक प्रतिष्ठान संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली. त्यामध्ये घोटाळा , गडबड झाली असा आरोप मी केला नव्हता, तर हा आरोप सर्वात आधी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. त्यावर, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका तेथील आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. यानंतर त्याबद्दल कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी विधानसभेत चर्चा झाली आणि एक आदेश पारीत झाला. मी बोललो, तर माझ्याकडून मानहानी कशी झाली ?, माझा संबंध कुठे आला?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. सगळं ऑन रेकॉर्ड आहे, असं त्यांनी नमूद केलं.
मीरा भाईंदर नगरपालिकेचा रिपोर्ट देखील आहे. काहीतरी गडबड, भ्रष्टाचार आहे असे फक्त प्रश्न मी विचारले. मी काही कागद कोर्टासमोर सादर केले. पण संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे. आम्ही कोर्टाचा आदर करतो .आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या सत्यासाठी आम्ही लढत राहू, असे ते म्हणाले.
विधानसभेआधी मला तुरूंगात टाकायचं आहे
मी कोणताही गुन्हा केला नाही मी जनतेच्या हिताचा फक्त मुद्दा मांडला तो भाजपच्या लोकांना झोंबला. विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचे आहे. मी सध्या बोलल्याबद्दल, भ्रष्टाचारा विरोधात आघाडी उभारल्याबद्दल मला तुरुंगात टाकायचं असेल, तर मी त्यासाठी तयार आहे असेही राऊत यांनी नमूद केलं.