“एका फ्रेममध्ये सगळे…” संजय राऊतांकडून ‘तो’ खळबळजनक फोटो ट्वीट, म्हणाले “कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच…”

| Updated on: Jan 08, 2025 | 9:53 AM

संजय राऊतांनी ट्वीट केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. संजय राऊतांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

एका फ्रेममध्ये सगळे... संजय राऊतांकडून तो खळबळजनक फोटो ट्वीट, म्हणाले कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच...
sanjay raut
Follow us on

Santosh Deshmukh Murder Case : गेल्या काही दिवसांपासून बीड आणि परभणी प्रकरणांमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली. यानंतर काल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे विरोधकांनी याप्रकरणावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक फोटो शेअर केला आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट शेअर केले आहे. यात त्यांनी एक फोटो पोस्ट करत मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत, जनता अगतिक झाली आहे, असा दावा केला आहे. संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिसत आहेत. त्यासोबतच संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला वाल्मिक कराडही यावेळी या फोटोत उभा असल्याचे दिसत आहे. तसेच वाल्मिक कराडच्या शेजारी धनंजय मुंडेही उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोवर 21 ऑगस्ट 2024 असे लिहिल्याचे पाहायला मिळत आहे.

या फोटोसोबत त्यांनी काही गंभीर सवालही उपस्थितीत केले आहेत. एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. ⁦अगतिक जनता, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. सध्या संजय राऊतांनी ट्वीट केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. संजय राऊतांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.