विधानसभेच्या निकालानंतर 20 दिवसानंतरही जर मंत्रीमंडळाची स्थापना होत नसेल, गृहखातं कोणाकडे आहे हे ठरत नसेल तर या राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतोयं. राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. बीडच्या केजमध्ये सरपंचाची हत्या, आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा खून असे अनेक गुन्हे समोर आहेत. पराभूत झालेले आमदार जे भाषा वापरतात ती ऐकून गुंडसुद्धा शरमेनं मान खाली घालतील.
दिवसाढवळ्या लोकाचं अपहरण होतंय, हत्या होतंय, सतीश वाघसारख्या उद्योजकाला मारलं जात असेल तर आणि पोलीसप्रमुख खासदारांचा फोन उचलत नसतील तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशाप्रकारेच चालवायचं आहे का ? हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं, म्हणजे आम्ही त्यांना त्या प्रकारे उत्तर देऊ, असे राऊत म्हणाले. आम्ही रस्त्यावर उतरू आमच्यावर गोळ्या झाडाल, आम्हाला तुरूंगात टाकाल, बाकी काय कराल ? आमची तयारी आहे अशा शब्दांत राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला.
अदानी-फडणवीस भेटीवर टीका
मुंबईसह, संपूर्ण महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्यासाठीच राज्यातलं सरकार गैरमार्गाने विजयी करण्यात आलंय. इतक्या मोठ्या उद्योगपतीला जकातनाकेही चालवायचे आहेत. यांची लायकी बघा. जगातला सगळ्या श्रीमंत माणूस, नरेंद्र मोदींचा मित्र आहे हा, याला आता महाराष्ट्रातले टोलनाकेही चालवायचे आहेत. म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबाडणं सुरू झालंय. जकातनाके हे चालवणार, विमानतळ हे चालवणार, भाजीची दुकानं हे चालवणार, मार्केट असो किंवा संसद हे चालवणार, आता जकातनाक्यापर्यंत तुम्ही लुटायाला आले आहात आणि त्यावर आम्ही आवाज उठवायचा नाही, अशा शब्दांत शिसवेना खासदार संजय राऊत यांनी अदानींवर हल्लाबोल चढवला. देवेंद्र फडणवीस काल अदानींना भेटले, त्यानंतरच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा काही लचका तुटणार आहे. आणि तोच आता जकातनाक्याच्या रुपाने आम्ही पाहतोय, राऊत यांनी अदानी-फडवणीसांच्या भेटीवरही टीका केली.
कोण आहेत गौतम अदानी ? याआधीदेखील जकातनाके महाराष्ट्रात चालवेत, ते आता अडानींनाच का ? तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करताय ? अदानींना हा संपूर्ण महाराष्ट्र गिळता यावा म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केली, असा आरोपही संजय राऊतांनी केला.
ऑपरेशन लोटस नव्हे ऑपरेशन डर
विधानसभेतील पराभवानंंतर मविआचे काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, त्यासंदर्भातही राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. भारतीय जनता पक्षाकडे पैसे आहेत, यंत्रणा आहेत, ते असं कोणतंही आपरेशन करू शकतात. दहशत निर्माण करून अशाप्रकारे त्यांनी यापूर्वीही माणसं फोडली आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांसारखी माणसं का पळून गेली, भीतीपोटीच ना… हे ऑपरेशन लोटस नव्हे ऑपरेशन डर होता, असा टोला राऊतांनी लगावला. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला जिसत नाही, असेही राऊत म्हणाले.