Samaana Editorial : महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सतत चर्चा सुरु आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. आता या योजनेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे वक्तव्य केले. ‘उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवले पाहिजे. शासन ही विषकन्या असते. कुठल्याही पक्षाची असली तरी ज्याच्या भरोशावर असते त्याला उध्वस्त करते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका. सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे, असे गडकरी म्हणाले. यानंतर आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टीका केली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन जोरदार निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी बिनधास्त असत्यकथन करीत असले तरी गडकरी यांनी ‘सत्य’कथन केले आहे. मग आता तुम्ही त्यांनाही बहीणविरोधी ठरविणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मिंधे सरकारने गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा बॅण्डबाजा सत्तापक्षाच्याच बडय़ा नेत्याने वाजवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिंधे सरकारच्या कथित ‘बहीण-भाऊ’ प्रेमाचा बुरखा फाडला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मिंधे सरकारने सुरू केली ती विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने, माता-भगिनींनी भाजपसह मिंधे आणि अजित पवार गटाला अक्षरशः लाथाडले आणि महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून दान टाकले. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याने भेदरलेले सत्ताधारी अनेक योजनांच्या घोषणा करीत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही त्यापैकीच एक सत्ताधाऱ्यांनी मोठा आव आणत या योजनेला ‘बंधुप्रेमा’चा मुलामा दिला असला तरी त्यामागील अंतस्थ हेतू मतांच्या बेगमीचाच आहे. शिवाय त्यावरून सत्तेतील तिन्ही पक्षांत पोस्टरबाजीची स्पर्धाच सुरू आहे. याच स्पर्धेतून एका ‘भावा’च्या पोस्टरवरून दुसऱ्या ‘भावां’चे फोटू गायब केले जात आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ फक्त मीच आहे, असे दाखविण्याचा आटापिटा भाजप तसेच मिंधे आणि अजित पवार गट करीत आहे. वरकरणी बोलताना हा निर्णय सरकारचा म्हणायचे आणि त्याचा राजकीय लाभ इतर दोन पक्षांना न मिळता फक्त आपल्याच पक्षाला मिळावा याचा खटाटोप करायचा. याला कुठले बंधुप्रेम म्हणता येईल? हा फक्त देखावा आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.
आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच लाडकी बहीण योजना ही मते विकत घेण्यासाठी केलेली बेगमी आहे, या विरोधकांच्या आरोपावर शिक्कामोर्तब केले आहे. या योजनेसाठी इतर योजना आणि प्रकल्पांचे पैसे राज्य सरकारने वळते केले, या आरोपाला ही त्यांच्या बोलण्याने बळकटी मिळाली आहे. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीनंतरही सुरूच राहील याची तरी शाश्वती कुठे आहे? सत्ताधारी कितीही सांगत असले तरी शेजारच्या मध्य प्रदेशातील भाजपच्याच सरकारमध्ये ही योजना बंद होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात भाजपला जे मोठे यश मिळाले त्यात ‘लाडली बहना’ योजनेचा सिंहाचा वाटा होता, असे म्हटले गेले. मात्र ‘उपयुक्तता संपलेल्या’ ज्या योजना बंद करता येऊ शकतात अशा योजनांची एक यादी भाजप सरकारच्याच अर्थ खात्याने आता बनवली आहे आणि त्यात पहिले नाव ‘लाडली बहना’ योजनेचे आहे. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीनंतर हेच होणार आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे राज्यकर्त्यांचे ‘बंधुप्रेम’ नसून मते विकत घेण्यासाठी दिलेली ‘लाच’ आहे आणि त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त कधी नव्हती एवढी बिघडली आहे. याचा जाब विचारणाऱ्या विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी ‘बहीणविरोधी’ ठरविले. मात्र आता त्यांचेच ‘ज्येष्ठ बंधू’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेचा ‘आरसा’ दाखविला आहे. या योजनेवरून राजकीय साठमारी करणाऱ्या तिन्ही भावांनी आपली थोबाडे त्यात पाहायला हवीत. लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी बिनधास्त असत्यकथन करीत असले तरी गडकरी यांनी ‘सत्य’कथन केले आहे. मग आता तुम्ही त्यांनाही बहीणविरोधी ठरविणार का? ‘मुख्यमंत्री’ हा शब्द आणि इतर दोन भावांची नावे, फोटो वगळून लाडक्या बहिणींना पत्र वगैरे पाठविणाऱ्या देवा‘भाऊं’चे गडकरींच्या या ‘सत्य’कथनावर काय म्हणणे आहे? असाही सवाल संजय राऊतांनी केला.