एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात भाजपमध्येच विरोध?, दिल्लीत मोठा निर्णय?; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Nov 24, 2024 | 12:25 PM

"महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे", आता यावरुन खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात भाजपमध्येच विरोध?, दिल्लीत मोठा निर्णय?; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
संजय राऊत, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Tv9
Follow us on

Sanjay Raut On New CM : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. आता यावरुन खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावर भाष्य केले. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी गुजरातला घ्यावा, असा टोलाही महायुतीला लगावला.

संजय राऊत काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यास भाजपचा विरोध आहे. दिल्लीतही तसा निर्णय झाला आहे, अशी माझी माहिती आहे. नवीन सरकार आलं तरी आम्हाला निवडणुकांचे निकाल अमान्य आहेत, हे स्पष्ट सांगतो. निवडणुकांमध्ये हार जीत होते. पण पहिल्या दोन तासात जी लढाई होती ती बरोबर सुरू होती. पुढील दोन तासांच्या पद्धतीने निकाल लागला तो संशयास्पद आहे. लोकशाहीत असं काही होत नाही. हरियाणामध्ये पुढील दोन तासात जे झालं तेच महाराष्ट्रात झाले. निकाल आधीच ठरवले होते. मतदान फक्त होऊ दिले”, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला

“मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. त्यांनी महाराष्ट्रात शपथ घेण्यापेक्षा गुजरातला जाऊन शपथविधी सोहळा घ्यावा. त्यांना याचा जास्त आनंद होईल. गुजरातला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक मोठा स्टेडिअम आहे तिथे जास्त लोक बसतात. त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा घेणं अतिशय योग्य ठरेल. शिवतीर्थावर घेतला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल”, असे संजय राऊत म्हणाले.

“जर तो शपथविधी वानखेडेवर घेतला तर त्याच्यासमोरील १०६ हुतात्मांचा अपमान ठरेल. यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळ्यासाठी गुजरातची निवड करावी. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं, म्हणून आणण्यात आलं आहे आणि लादण्यात आलं आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे यशाचे गुपित

दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्का दिला. काहीजण तर अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. तर या भव्यदिव्य यशाचे आणि तितक्याच मोठ्या पराभवाचे विश्लेषण सुरू झाले आहे. भाजपाच्या या यशाचं गुपित म्हणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे होते, ही बाब आता स्पष्ट झाली आहे.