“पंतप्रधान मोदी हात लावतात त्याची माती होते”, संजय राऊतांचा घणाघात

| Updated on: Aug 27, 2024 | 12:01 PM

अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तर विरोधक या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठी टीका केली.

पंतप्रधान मोदी हात लावतात त्याची माती होते, संजय राऊतांचा घणाघात
राऊतांनी सरकारला घेरलं
Follow us on

Sanjay Raut Criticise PM Narendra Modi : छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची घटना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तर विरोधक या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठी टीका केली.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते, असे विधान संजय राऊतांनी केले

“मोदींनी जिथे हात लावला ते उद्धवस्त झाले”

“आपल्याकडे मराठीत अशी म्हण आहे की हात लावीन तिथे सोनं होतं. पण पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते. अयोध्येच्या राम मंदिरात गळती होत आहे. नवीन संसद भवनाला गळती लागली आहे. ज्या पुलांचे उद्धाटन केले, ते पूल उध्दवस्त झाले आहेत. कोस्टल रोडला गळती लागली आहे. अटल सेतूला भेगा पडल्यात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पाहिलं तर तोही उद्धवस्त झाला. गेल्या 70 वर्षात हे देशाचे पहिले पंतप्रधान असतील, त्यांनी जिथे जिथे हात लावला ते उद्धवस्त झाले आहे. देशही उद्धवस्त होत आहे. ही श्रद्धा असू दे किंवा अंधश्रद्धा, पण हे देशात होत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.