राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून खलबत सुरू असतानाच विशिष्ट मतदारसंघावर दावा सांगत महायुती-मविआच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक बड्या नेत्यांचे विविध पक्षात इनकमिंग-आऊटगोईंगही वाढलं आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आजच पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र आता याच दरम्यान महायुतीमधील एका नेत्याने महत्वाचे वक्तव्य केलं असून त्याचीच सर्वत्र चर्चा आहे. महायुतीमधील शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान करत संकेत दिले आहेत. ‘ आत्ता फार अलर्ट रहायला हवं, कधी, कोण , काय करेल याचा नेम नाही. राजकारणात रोज नवे प्रयोग सुरू आहेत.दसऱ्याची वाट पहात आहेत, दसरा मेळाव्यात बरंच काही घडू शकतं ‘ असं सांगत संजय शिरसाट यांनी मोठ्या घडामोडींचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं असून आता राज्याच्या राजकारणात नवा काय स्फोट होणार, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
दरम्यान कालच शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही अशाच स्वरुपाचं विधान केलं होतं. ब्रेकिंग न्यूजसाठी अलर्ट राहावं. “महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलतंय, पत्रकारांनो अलर्ट राहा, नाहीतर धावपळ होईल”, असं सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं. त्यातच आता संजय शिरसाट यांनीही असंच काहीस विधान केल्यानं सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, राजकारण कोणतं वळण घेणार याचीही चर्चा आहे.
मविआचं काही खरं नाही
20-25 अपक्ष आमदार यंदाच्या विधान सभेत मुख्यमंत्री पदाची दोर घेऊ शकतात जर समीकरण वर खाली गेलं तर, पण सध्या महायुती जोरात आहे.मविआचं काही खरं नाहीये.. त्यांची युती होणार की नाही माहीत नाही पण अपक्षांचा टेकू आम्हाला लागणार नाही, असे शिरसाट म्हणाले.
विधानसभेत फरक दिसून येईल
आमची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, हे तेवढं सत्य आहे. पण किती जागा मागणार आहे हे मी बोलणे योग्य नाहीये. कारण मी जर आकडा सांगितला तर मग वाचाळवीरांना आवरा, अशी टीका माझ्यावर होऊ शकते. त्यामुळे मी आकडा सांगणार नाही. पण शिवसेनेचा स्ट्राईक रेट प्रचंड वाढलाय, सीएम शिंदे हे चेहरा आहेत, विधानसभेत फरक दिसून येईल, असे संजय शिरसाट म्हणाले.
उद्या दुसरीकडे जातील
भाजप नेते हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसरद पवार गटात प्रवेश करत आहेत. त्या मुद्यावरही संजय शिरसाट बोलले. ‘ हर्षवर्धन पाटील यांच्या इथली जागा अजित पवार लढवत आहेत, म्हणून त्यांनी शरद पवारांची वाट धरलीये. उद्या आणखी कुठून तिकीट मिळालं तर नेते दुसरीकडे जातील’ अशी टीका त्यांनी केली.
बापाशी लढा, पोराशी काय लढता ?
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यावर नुकतीच टीका केली होती. त्याच्या या विधानाचाही संजय शिरसाट यांनी समाचार घेतला. बेरोजगारांचं नेतृत्व बेरोजगार करत आहेत.शिंदेंच्या मुलावर टीका करत आहेत. हे म्हणजे तुमचा तो बाळ आणि दुसऱ्यांचा तो कार्टा. पण ही टीका योग्य नाही, मग तुमच्या मुलावर उद्या कोणी टीका केली की वाईट मानून घेऊ नका… बापाशी लढा पोराशी काय लढता ? असा टोला शिरसाट यांनी हाणला