Shiv Sena Eknath Shinde Candidate List : कुणाची बायको तर कुणाचा मुलगा… शिंदे गटाच्या यादीतही घराणेशाहीला रेड कार्पेट

| Updated on: Oct 23, 2024 | 9:08 AM

अवघ्या महिन्याभराच्या अंतरावर आलेल्या विधानसभा निवडणुंकासाठी अखेर शिवसेना शिंदे गटातर्फे 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधि देण्यात आली आहे. तसेच पक्षातील अनेकांच्या कुटुंबियांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली त्यातही हाच प्रकार पहायला मिळाला होता. घराणेशाहीच्या नावाने शंख करणाऱ्या या पक्षांनी आपल्या यादीतून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊन तीच परंपरा पुढे चालवल्याचे दिसत आहे.

Shiv Sena Eknath Shinde Candidate List : कुणाची बायको तर कुणाचा मुलगा… शिंदे गटाच्या यादीतही घराणेशाहीला रेड कार्पेट
शिंदे गटाच्या यादीतही घराणेशाही
Image Credit source: social media
Follow us on

आगामी विधानसभा सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. ही पक्षाची पहिली यादी आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चासुरू होत्या,त्यानंतर गेल्या आठवड्यात भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. तर काल शिवसेना शिंदे गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

भाजपच्याच पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेकडूनही अनेक विद्यमान आमदारांना तसेच पक्षातील अनेक नेत्यांच्या कुटुंबियांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे काँग्रेसला घराणेशाहीवरून नाव ठेवायची आणि दुसरीकडे आपणही आपल्या पक्षात घराणेशाहीला रेड कार्पेट अंथरायचं ही भाजपची परंपरा शिवसेना शिंदे गटानेही कायम ठेवल्याचं चित्र यातून दिसून आलं. शिवसेनेची पहिली यादी समोर आल्यानंतर या यादीत राजकीय घराण्यातील किती उमेदवारांची नावे आहेत, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

कोणाकोणाला संधी ?

1) चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल पाटील याला तिकीट देण्यात आलं आहे.

2) माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनाही संधी मिळाली आहे.

3) पैठणमधून खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विकास भुमरे यांना तिकीट.

4) जोगेश्वरी (पूर्व) मतदारसंघातून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना तिकीट.

5) राजापूर मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना तिकीट.

6) दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना खानापूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले

जोगेश्वरी पूर्वेतून वायकरांच्या पत्नीला उमेदवारी

शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांची पत्नी सौ. मनिषा वायकर यांना उमेदवारी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी निवडणूक जिंकली आणि ते खासदार म्हणून निवडून आले. तर आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीत मंत्री उदय सामंत यांच्यासह भावालाही संधी

शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 45 उमेदवारांमध्ये मंत्री उदय सामंत यांचा तसेच त्यांच्या भावाच्या नावाचाही समावेश आहे. रत्नागिरीमधून उदय सामंत यांना पुन्हा संधी मिळाली आहे तर त्यांचेच बंधू किरण सामंत यांना राजापूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय.

तर दिवंगर आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांना खानापूरमधून संधी मिळाली आहे.

 

राज ठाकरेंच्या मुलाविरोधात हा उमेदवार ठाकणार उभा

दरम्यान शिवसेना शिंदे गटाने माहिम मतदारसंघातून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात त्यांचा सामना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याविरोधात होणार आहे. या लिस्टमध्ये त्या उमेदवारांचीही नावं आहेत जे बंडावेळी ठाकरे यांना सोडून शिंदेंसोबत आले होते. तसेच शिंदे गटातील अनेक मंत्र्यांच्या नावांचाही यात समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघात अपेक्षेनुसार मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तर पाचोरा मतदार संघात किशोर पाटील यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर नव्या चेहऱ्यांमध्ये राजकीय घराण्यातील दिग्गज आणि काही अपक्षांचा पक्षाने समावेश केला आहे.