रामदास कदम यांचा थेट राज ठाकरे यांना सल्ला, म्हणाले “चांगल्याला चांगलं…”

| Updated on: Oct 15, 2024 | 5:19 PM

राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय फक्त निवडणुकीपुरता घेतलेला नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असे म्हटले होते.

रामदास कदम यांचा थेट राज ठाकरे यांना सल्ला, म्हणाले चांगल्याला चांगलं…
Follow us on

Ramdas Kadam advice Raj Thackeray : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा करण्यात येणार आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे ही टोल माफी दिली जाणार आहे. काल रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय फक्त निवडणुकीपुरता घेतलेला नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असे म्हटले होते. आता राज ठाकरेंना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी एक सल्ला दिला आहे.

रामदास कदम काय म्हणाले?

“राज ठाकरे यांच्यात आम्ही बाळासाहेबांना पाहतो. ते स्पष्ट बोलतात. पण राज ठाकरे यांनी चांगल्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक गोष्टीत टीका करणे गरजेचे नसते. स्पष्ट बोलणारा नेता ही आपली ओळख आहे आणि ती राज यांनी जपावी”, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी टोलमाफीबद्दल आम्ही वारंवार मागणी करत होतो, असे म्हटले होते. “टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली, यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दरम्यान मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.