Sanjay Shirsat Attack On Rahul Gandhi : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावरुन जोरदार टीका केली. “महाराजांचा पुतळा तुटला कारण नियत चुकीची होती”, असा आरोप राहुल गांधींनी केला. त्यावर आता शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी कोल्हापुरात केलेल्या भाषणावेळी छत्रपती शिवाजी महाराज याऐवजी फक्त शिवाजी महाराज असा उल्लेख केला. यावरुनच संजय शिरसाट यांनी भाष्य केले.
“राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लाज वाटते. काँग्रेसच्या लाचार लोकांनी आज गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. राहुल गांधी यांनी ठरल्याप्रमाणे आज नौटंकी केली. विदेशात जाऊन आरक्षण हटवण्याची भाषा करणारा एका ड्राईव्हरच्या घरी जेवल्याचे कौतुक जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय”, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला.
“काँग्रेसने नेहमीच दुटप्पी भूमिका बाळगली. एखाद्या लहान मुलाला उचलायचे. एखाद्या वयोवृद्ध माणासाच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचे दर्शन घ्यायचे. या नौटंकीच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत राजकारण केले. आमच्या महाराजांचे नाव अभिमानाने आणि स्वाभिमानाने घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असेच नाव उच्चारले पाहिजे”, असा सल्लाही संजय शिरसाट यांनी दिला.
“यापूर्वीही राहुल गांधी यांना महाराजांचा पुतळा देण्यात आला होता. तेव्हा त्यांनी तो एका हाताने उचलला होता. अशा राहुल गांधीकडून आज महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले ही आमच्यासाठी दुर्देवी घटना आहे. याचा निषेध समजातील सर्वच स्तरातील लोकांनी केला पाहिजे. महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लोक तयार झाले आहेत. लाचार महाविकास आघाडीला गांधीचे पाय चेपावे लागतात. दिल्लीला जावे लागते. या लाचारांनी हिंदुत्वाचे नाव देखील घेऊ नये”, असेही संजय शिरसाट म्हणाले.