Sanjay Shirsat On Raj Thackeray statement : “शिवसेना ही काही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही. धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच प्रॉपर्टी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांचच अपत्य आहे”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. डोंबिवलीतील पहिल्या सभेत राज ठाकरे महायुतीसह महाविकासाआघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. आता त्यांच्या या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “राज ठाकरे सत्य बोलले”, असे विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे.
संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या भाषणातील विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. “राज ठाकरे एकदम योग्य बोलले. त्यांचे भाषण सत्य वचनी होतं. राज ठाकरे यांनी भाषणात जे मुद्दे मांडले, आमचे तेच म्हणणे आहे. शिवसेना बाळासाहेबांची, धनुष्यबाण बाळासाहेबांचा, हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे, आम्ही फक्त ते पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहोत, आम्ही फक्त पाईक आहोत”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
“राष्ट्रवादीबद्दल मला काहीही देणे-घेणे नाही. मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षात पहिल्यापासून आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराने चालतो. आम्ही राज साहेबांबद्दल ब्र शब्द बोललेलं आम्हाला आठवत नाही. पक्ष वेगळे असले तरी आम्ही नातं तोडण्याचा प्रयत्न केला नाही. राज ठाकरे सोडा, उद्धव ठाकरे यांना सुद्धा खालच्या भाषेत आम्ही बोलत नाही. संस्कृती आणि मित्रत्व जपण्यासाठी शरद पोंक्षे जर राज ठाकरे यांच्या स्टेजवर गेले असतील तर आम्ही त्यात काही गैर समजत नाही”, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.
“राज ठाकरे आम्हाला काही वैयक्तिक बोलले असते तर आम्ही उत्तर दिलं असतं. राज ठाकरे हे योग्य बोलले आहेत. अडीच कोटी बहिणी आमच्या विरोधात कशा उभ्या राहतील, याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही. आम्ही जनतेला हिशोब देणारे आहोत. आम्ही घरात बसून हिशोब करत नाहीत. आमच्याकडे इन्कमिंग नाही, आमच्याकडे आउटगोईंग आहे आणि हे आउटगोइंग सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे”, असेही संजय शिरसाट म्हणाले.
“भोजपुरी नाचली की कोण नाचले हा प्रांतवाद आता करण्याचे कारण नाही. सर्व जाती धर्माचे संस्कृती एका ठिकाणी एका मंचावर आणली. काही लोक पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढतात त्यावर टीका केली असती तर सार्थ झाला असता, नाच गाणे आणि संस्कृती हा मुद्दा होऊ शकत नाही. छटपूजेला तुम्ही जाता, आम्ही जातो. संस्कृती जपली पाहिजे”, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.