गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 8 मार्च 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही काळातच निवडणुकीच्या तारखाही जाहीर होतील. राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच पक्षांमध्ये जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. शिरुर मतदारसंघातून नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही महत्वाचं विधान केलं आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल त्यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट ?
पुण्यातील शिरूर मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही जोरदार फिल्डींग लावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिरूर मतदार संघातून अजित पवार गटाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता सुरू आहे.त्यासंदर्भातील अनेक चर्चाही सुरू आहेत. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘नाना आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे’ असं त्यांनी म्हटलं आहे. असं विधान करत त्यांनी चर्चेची दारं अजूनही किलकिली असल्याचे सूतोवाच केले आहे. अभिनेते नाना पाटेकर हे मात्र शिरूर मतदारसंघातून लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सध्या भलतीच रंगली आहे.
संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
दरम्यान संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे काल धाराशिवच्या सभेत बोलताना तुळजा भवानी देवीची शपथ घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटं बोलत असल्याचं म्हणाले. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या याच दाव्यावर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. “उद्धव ठाकरे कालच्या सभेत म्हणाले की अमित शाह खोटं बोलतात. त्यांची शपथ खरी आहे. पण पहिली अडीच वर्षे भाजप आणि नंतरची शिवसेना असं ठरलं होतं. पण त्यांना युती करायचीच नव्हती. शेवटच्या क्षणाला भाजपने हे सुद्धा मान्य केलं की आधी अडीच वर्षे (तुम्हाला) देतो. हे खोटं आहे म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगावं. पण, भाजपसोबत जायचं नाहीच, हेच त्यांनी ठरवलं होतं , असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “लाचार माणसांना मी अनेकदा सिल्व्हर ओकवर जाताना पाहिले आहे. लाचार लोक काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधीला मिठ्या मारताना पाहिलं आहे”, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला.