रामदास कदम यांच्या चिरंजीवाला कट्टर शत्रू असलेल्या संजय राऊत यांची कोणती गोष्ट आवडते; रोखठोक उत्तर काय?

| Updated on: Aug 19, 2024 | 2:09 PM

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांनी थेट संजय राऊत यांच्या एका कलाकृतीचं कौतुक केलं आहे. संजय राऊत यांनी निर्माण केलेला ठाकरे सिनेमा आपला आवडता सिनेमा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही. आडनाव ठाकरे असले तरी बाळासाहेब हे एकच आहेत, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम यांच्या चिरंजीवाला कट्टर शत्रू असलेल्या संजय राऊत यांची कोणती गोष्ट आवडते; रोखठोक उत्तर काय?
रामदास कदम यांच्या चिरंजीवाला कट्टर शत्रू असलेल्या संजय राऊत यांची कोणती गोष्ट आवडते ?
Follow us on

शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे नेहमीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करत असतात. संजय राऊत यांना शत्रू मानूनच त्यांचा हल्ला असतो. मात्र, रामदास कदम यांचे चिरंजीव, आमदार योगेश कदम यांना मात्र संजय राऊत यांची एक गोष्ट आवडली आहे. तसं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. संजय राऊत यांनी निर्माण केलेला सिनेमा आवडल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे धर्मवीरपेक्षा संजय राऊत यांनी निर्माण केलेल्या सिनेमाला त्यांनी पसंती दिली आहे.

ठाण्यातील मेळाव्यात आमदार योगेश कदम यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यात रॅपिड फायर राऊंडही होता. या मुलाखतीत योगेश कदम यांना खासकरून राजकीय प्रश्नच विचारण्यात आले. या प्रश्नांचं त्यांनी दिलखुलासपणे उत्तरही दिलं. आवेळी त्यांना तुमचा आवडता सिनेमा कोणता? ठाकरे की धर्मवीर? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी त्यांनी चक्क कट्टर शत्रू असलेल्या संजय राऊत यांनी तयार केलेला सिनेमा आवडल्याचं सांगितलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच धर्मवीर आनंद दीघे घडले. त्यामुळे ठाकरे हा सिनेमा मला आवडतो, असं योगेश कदम म्हणाले.

योगेश कदम यांना कोणते प्रश्न विचारले?

प्रश्न – लहानपणी तुमची स्वप्न काय होतं?
उत्तर – मला क्रिकेटर व्हायचं होतं. पण रामदास भाईनी जी सेवा केली ती आपण करायची म्हणून मी राजकारणात आलो. माझी सुरूवात गल्लीपासून झाली. मी गल्ली विसरणार नाही.

प्रश्न – महाविद्यालयीन जीवनातील कोणता क्षण आठवतो.
उत्तर – परीक्षेचे मार्क पाहिल्यावर भाई काय बोलतील? हे मनात यायचं. हे अजूनही आठवतं. रामदासभाईंनी खेडमध्ये सर्व शैक्षणिकबाबी उभ्या केल्या आहेत.

प्रश्न – कोणता क्षण कुटुंबासाठी कठीण होता?
उत्तर – 2021मध्ये तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला संपवण्याचा विडा घेतला होता. तेव्हा पहिल्यांदाच भाईंच्या डोळ्यात अश्रू पाहिले. तो काळ सर्वात कठीण होता. मला त्यावेळी स्थानिक निवडणुकीत एबी फॉर्मपण वाटू दिले नाहीत.

प्रश्न – तुमच्या मुलांनी कोणत्या क्षेत्रात जावं?
उत्तर – त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं.

प्रश्न – पहिल्यांदा आमदार झाल्यावर काय भावना होत्या?
उत्तर – दापोली मतदारसंघातील इतिहासातील सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आल्यावर भाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. ते मी विसरू शकणार नाही. बाळासाहेबांकडे मी दापोली मतदारसंघ मागितला होता. पण मातोश्रीमधील काही लोकांनी गुहागर मतदारसंघ रामदासभाईना दिला आणि पक्षातील काही लोकांनी त्यांना पाडलं. त्याच उत्तर मी निवडून आल्यावर दिल्याचा आनंद आहे.

प्रश्न – मतदारसंघातील लक्षणीय कामे कोणती?
उत्तर – मतदारसंघातील 50 बेडचे रुग्णालय 100 बेडचे करण्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. दापोलीच्या रुग्णालयात मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रश्न – भविष्यात कोणते काम करण्याची इच्छा आहे?

उत्तर – धरणांची कामे अपुरी आहेत. ती पूर्ण करायची आहे. दापोली मतदारसंघात एमआयडीसी नाहीत. खेड तालुक्यात कोकाकोलाची कंपनी आणायला यशस्वी झालो. आज आपण ठाण्यात मेळावा घेतला आहे. असे मेळावे पुन्हा घेण्याची गरज पडू नये अशी भरीव कामगिरी करायची आहे.

प्रश्न – मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल काय वाटतं?

उत्तर – मी माझ्या टर्ममध्ये दोन मुख्यमंत्री पाहिले. दोघांची तुलना होणे गरजेचे आहे. उद्वव ठाकरे यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागायची. एका सहीसाठी केबिनबाहेर तीन तास थांबावं लागायचं. साडे तीन महिने अपॉइंटमेंट मिळत नसायची. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कधीही भेटता येतं. वर्षावर कधीच अडवलं जात नाही. सामान्य माणूस देखील वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो.

प्रश्न – युवकांसाठी काय व्हिजन असेल?

उत्तर – रोजगाराची संधी कोकणात उपलब्ध झाली पाहिजे. पर्यावरणपूरक उद्योग कोकणात आले पाहिजे. लघू उद्योगाचा उपयोग तरुणांनी करून घेतला पाहिजे.

प्रश्न – मंत्रीपद मिळालं तर…

उत्तर – शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त मोडणं मला आवडत नाही. या सगळ्यांच्या ताकदीवर मी पुन्हा निवडून येणार आहे. त्यानंतर रामदासभाई आणि एकनाथ शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती पार पाडेल.

रॅपिड फायर

प्रश्न – आपला आवडता सिनेमा कोणता ठाकरे की धर्मवीर?
उत्तर – बाळासाहेबांमुळे दिघे साहेब घडले. त्यामुळे ठाकरे हा सिनेमा आवडता आहे.

प्रश्न– आवडती अभिनेत्री कोण? माधुरी की कतरिना?
उत्तर – श्रेया कदम

प्रश्न– आवडत गाणं कोणतं?
उत्तर – कसमे वादे प्यार वफ़ा सब…

प्रश्न – आवडता क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर की रोहित शर्मा?
उत्तर – सचिन तेंडुलकर.