बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. तरी अद्याप या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही. यामुळे सध्याचे राजकीय वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्येप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप केला जात आहे. वाल्मिक कराड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी सुरु आहे.
आता या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. धस साहेब आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!, असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
“सन्मा. धससाहेब, पिकविमा, मल्टीस्टेट बँकघोटाळे, खून अपहरण खंडणी यात गुन्हेगार, आका आणि आकांचे आका यांना शिक्षा होण्यासाठी आपण जंग जंग पछाडताय. आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सन्मा. धससाहेब,
पिकविमा, मल्टीस्टेट बँकघोटाळे, खून अपहरण खंडणी यात गुन्हेगार, आका आणि आकांचे आका यांना शिक्षा होण्यासाठी आपण जंग जंग पछाडताय. आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे.
पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!@SureshDhasBJP— SushmaTai Andhare (@andharesushama) January 10, 2025
सुषमा अंधारे यांच्या या पोस्टनंतर आता अनेकजण आका आणि आकांचे आका कोण, असा प्रश्न विचारत आहेत. तसेच त्यांच्या पोस्टनंतर सुरेश धस यांचे आका कोण, असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान सुरेश धस यांनी मुन्नी या शब्दाचा पुनरुच्चार केला. ती मुन्नी आहे, तिला कळले आहे, ती महिला भगिणी नाही. ती मुन्नी राष्ट्रवादी मधलीच आहे. मुन्नीला आवाहन आहे की कुठेही येऊन बसावे. मुन्नीसोबत आमचे चार पाच वेळा फोटो असतील. मुन्नी बोलत नाही, मुन्नीचे कपडे टरा टरा फाडले जातील. मुन्नी मला घाबरत आहे. मुन्नीचे माझ्यावर फार प्रेम आहे. आपण मुन्नीची वाट पाहूयात. आमचे प्रेम 2017 पासूनचे आहे, असा खुलासा सुरेश धस यांनी केला होता.