पालकमंत्र्यांचा निधीवाटपात किती ‘टक्के’ वाटा, शिवसेना खासदारांचा मोठा आरोप

| Updated on: Aug 14, 2023 | 10:17 PM

निधी मिळत नाही. निधी दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तुम्ही कसे चोर आहात हे दाखवून देऊ. पालकमंत्री दिशाभूल करत आहेत. स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न झाल्यामुळे तो निधी त्यांच्या लोकांना देत आहेत.

पालकमंत्र्यांचा निधीवाटपात किती टक्के वाटा, शिवसेना खासदारांचा मोठा आरोप
MP SANJAY JADHAV
Follow us on

परभणी । 14 ऑगस्ट 2023 : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, खासदार यांना समान प्रमाणात निधी देण्यात यावा अशी मागणी सातत्याने होत आहे. अजित पवार हे अर्थमंत्री असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी देत असल्याची तक्रार शिवसेना आमदारांनी केली होती. अजित पवार यांच्यावर आरोप करून एकनाथ शिंदे यांनी बंड केले. मात्र, त्याच अजित पवार यांना आपल्यासोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे अर्थखातेही सोपवले. मात्र, अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आठ मंत्री यांच्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार यांनी पालकमंत्री यांच्यावर एक मोठा आरोप केला आहे.

भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना जास्त निधी देण्यात आल्याचा आरोप राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आला होता. त्यावरून विधिमंडळात मोठे घमासान झाले होते. अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात कुणावरही अन्याय केला जाणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र, याच निधीवाटपावरुन उद्धव ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

काही उकिरड्यावर नेऊन

परभणी आणि आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीचा एक रुपयाचाही निधी दिला नाही. आम्हालाही जनतेने निवडून दिले आहे. आम्ही जो निधी मागतो तो जनतेच्या विकासकामांसाठीच निधी मागतो. आम्हाला काही उकिरड्यावर नेऊन तो निधी वाटायचं नाही असा टोला खासदार जाधव यांनी पालकमंत्र्यांना लगावला.

तुम्ही कसे चोर आहात…

पालकमंत्री आम्हाला निधी देऊ म्हणतात. आम्ही वाट बघतो. पण निधी काही मिळत नाही. आम्हाला निधी दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू तुम्ही कसे चोर आहात हे दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला. पालकमंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे तो निधी त्यांच्याच लोकांना देत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

निधीचा व्यापार करणारा पालकमंत्री

पालकमंत्री यांच्याजवळचे काही अधिकारी आहेत. ते प्रत्येक कामात टक्केवारी घेतात. याच टक्केवारीत पालकमंत्री यांचा १५ टक्के वाटा असतो असा आरोप खासदार जाधव यांनी केला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे साखर कारखाने, विद्यापीठ आहे. हे तुम्ही कोणासाठी करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी अनेक पालकमंत्री बघितले. परंतु, निधीचा व्यापार करणारा असा पहिला पालकमंत्री बघितला अशी टीकाही त्यांनी केली.