“अमित ठाकरेंच्या पराभवासाठी एकनाथ शिंदे…”, संजय राऊतांचा मोठा खुलासा, म्हणाले “माहीमची जागा जिंकण्यासाठी राज ठाकरेंनी…”

| Updated on: Nov 10, 2024 | 1:16 PM

"अमित ठाकरे हे तरुण आहेत व त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण एक जागा जिंकता यावी यासाठी ‘मनसे’ने भाजपास इतर सर्वत्र मदत होईल अशी भूमिका घेतली आहे", असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

अमित ठाकरेंच्या पराभवासाठी एकनाथ शिंदे..., संजय राऊतांचा मोठा खुलासा, म्हणाले माहीमची जागा जिंकण्यासाठी राज ठाकरेंनी...
राज ठाकरे, संजय राऊत
Follow us on

Sanjay Raut On Raj Thackeray Amit Thackeray : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंच्या विरुद्ध शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. दादर-माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांच्या चिरंजीवांचा पराभव व्हावा यासाठी एकनाथ शिंदेंनी पुन्हा गुवाहाटीस कामाख्या देवीचे दर्शन केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरातून संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. यावेळी संजय राऊतांनी माहीम विधानसभा मतदारसंघांवरुन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अमित ठाकरे हे तरुण आहेत व त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण एक जागा जिंकता यावी यासाठी ‘मनसे’ने भाजपास इतर सर्वत्र मदत होईल अशी भूमिका घेतली आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

नरेंद्र मोदी व अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू अहेत. त्यांना महाराष्ट्रात घुसू देऊ नका, अशी गर्जना करणारे राज ठाकरे हे आता मोदी व शहांच्या गरब्यात सामील झाले. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा, म्हणजे मोदी-शहा ठरवतील तोच होईल हे मान्य करून भाजपच्या मदतीसाठी ते बाहेर पडले. राज ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना दादर-माहीम विधानसभेतून उभे केले व चि. अमित यांच्या विजयासाठी त्यांना भाजपची मदत हवी. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र आपले उमेदवार उभे केले. श्री. अमित ठाकरे हे तरुण आहेत व त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. राजकारणात जास्तीत जास्त चांगल्या तरुणांनी यावे असे सगळ्यांनाच वाटते. प्रश्न इतकाच आहे की, एक जागा जिंकता यावी यासाठी ‘मनसे’ने भाजपास इतर सर्वत्र मदत होईल अशी भूमिका घेतली, अशी टीका संजय राऊतांनी केली.

भाजप आज महाराष्ट्राचा ‘एक नंबर’चा शत्रू आहे हे पहिले व देवेंद्र फडणवीस यांना मदत करणे म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शत्रूंना मदत करणे हे दुसरे. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने येथे राज ठाकरे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली. राज ठाकरे यांनी शिवसेना फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीचे समर्थन केले. कारण हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घडले. त्याचा आनंद राज ठाकरे यांना झाला असावा. या काळात मुख्यमंत्री शिंदे व राज ठाकरे यांच्यात अनेकदा बैठका झाल्या. एकमेकांकडे जात राहिले, अशी टीकाही संजय राऊतांनी केली

पण राजकारणात राज्यापेक्षा स्वार्थ पुढे रेटला जातो. राज ठाकरे यांना शिंदेंपेक्षा फडणवीस जवळचे वाटतात. कारण ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांची सूत्रे दिल्लीतील शहा-मोदींकडे आहेत. शिंदे यांना राज ठाकरे यांचे वर्चस्व मान्य होणार नाही. शिंदे हे लोकनेते नाहीत व कधीच होऊ शकणार नाहीत. पैशाने जमवलेल्या गर्दीचे तात्पुरते नेते आहेत व फडणवीस-राज ठाकरे एकत्र येऊन आपला काटा काढीत असल्याच्या भयाने ते सध्या पछाडले आहेत. त्यामुळे दादर-माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांच्या चिरंजीवांचा पराभव व्हावा, यासाठी ते पुन्हा एकदा गुवाहाटीस कामाख्या देवीचे दर्शन करून परतले असतील, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

राज ठाकरे यांना नक्की काय सांगायचे आहे?

“एका दादर-माहीम मतदारसंघासाठी राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान पणाला लावला आहे व शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत टीका करीत सुटले आहेत. श्री. राज ठाकरे यांना नक्की काय सांगायचे आहे? याबाबत गोंधळाचे चित्र नेहमीच निर्माण होते. शिवसेना व धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रॉपर्टी असल्याचे ते आता सांगत आहेत. ही प्रॉपर्टी बाळासाहेबांची हे त्यांना दोन वर्षांनी समजले व ते बोलून गेले, पण ज्यांनी ही प्रॉपर्टी चोरली व एकनाथ शिंदेंच्या हातावर उदक ठेवावी तशी ठेवली त्या मोदी-शहा-फडणवीस यांच्या समर्थनासाठी राज ठाकरे आज उभे आहेत. हे कसे काय?” असा सवाल संजय राऊतांनी केला.

अकोल्याची पुनरावृत्ती दादर-माहीममध्ये होणार

“वंचितांचे राजकारण करणारे श्री. प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हे उघडपणे मोदी-शहांच्या महाराष्ट्रविरोधी राजकारणावर बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्राची सर्व संपत्ती गुजरातकडे ओढली जात आहे व उद्या महाराष्ट्राला भिकेचा कटोरा घेऊन बिहारप्रमाणे कायम दिल्लीच्या दारात उभे राहावे लागेल, अशी परिस्थिती मोदी-शहांनी निर्माण केली. हे सर्व ज्यांना वेदना देत नाही त्यांच्याकडून महाराष्ट्र कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, पण या हटवादात प्रकाश आंबेडकरांचे जे अकोल्यात झाले त्याच अकोल्याची पुनरावृत्ती दादर-माहीमला होईल हे स्पष्ट दिसते. दादर येथे शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे येथील मतदार उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभे राहतील. दादर, माहीम, परळ, आपले स्वत्व सोडणार नाही”
, असेही संजय राऊतांनी सांगितले.