देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. मात्र यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं. यानंतर नेत्यांचं नाराजीनाट्य सुरू असून छगन भुजबळांनी तर थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तर तानाजी सावंत, रवी राणा यांच्यासारखे नेते आपल्या बॅगा पॅक करून नागपुरातून निघून गेले. महायुतीमधील या नेत्यांच्या नाराजीनाट्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीला टोला लगावला आहे. काय म्हणाले संजय राऊत ? नाराज आमदार काही वेळ रडतीस, त्यांच्या अश्रूंना काय किंमत ? असा सवाल विचारत एखाद-दुसऱ्या नाराज आमदारामुळे या सरकारला तडा जाणार नाही, नाराजांना एखादं खेळणं देऊन गप्प बसवतील, अशी टीका राऊतांनी केली.
भुजबळांचा पुरेपूर वापर केला
भारतीय जनता पक्षाकडे स्वत:चं बहुमत आहे, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे एकत्र मिळून त्यांच्याकडे 225 च्या आसपास आकडा आहे. राज्यातील 288 सदस्यांच्या विधानसभेत हे बहुमत खूप मोठं आहे, त्यामुळे कोणाच्या मनातला अंगार, संताप, असंतोष कितीही बाहेर पडला, तरीही त्या ठिणग्यांनी या ईव्हीएम सरकारला चटके बसतील अशी शक्यता आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. मधल्या काळात मनज जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली, त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता, असं आमच्या सर्वांचं म्हणणं होतं, असं राऊत म्हणाले. . कारण दोन्ही समाज ( मराठा आणि ओबीसी) हे महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत. सगळ्यांना न्याय मिळावी ही आमची सर्वांची भूमिका असताना भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली, पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. मनोज जरांगे यांच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा पुरेपूर वापर करण्यात आला, असा आरोप राऊतांनी केला.
त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलं…
ते स्पष्ट दिसत होतं. नाहीतर इतकी टोकाची भूमिका भुजबळ घेऊन शकत नव्हते. आणि ज्यांनी त्यांना ही भूमिका घ्यायला लावील, त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलंय अशी टीका संजय राऊत यांनी केली. आता भुजबळांनी कितीही आदळआपट केली तरी त्यांची लढण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता किती आहे, हे पहावं लागेल, असं राऊत म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा रहावा, समन्वय रहावा ही आमची सर्वांची आजही भूमिका आहे. पण आता बाकी इतर लोकं अश्रू ढाळत आहेत, त्यांच्या अश्रूंना कोण विचारतंय ? पुरंदरचे आमदार असो वा मुंबईतल्या मागठाण्याचे आमदार असोत, किंवा स्वत: चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार असोत, संजय कुटे .. त्यांच्या अश्रूंना काय किंमत आहे ? रडतील रडतील आणि गप्प बसतील , आपटतील आपटतील आणि गप्प बसतील, अशी टीका राऊतांनी केली. कारण एखाद-दुसरा आमदार नाराज झाला म्हणून या सरकारला तडा जाईल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे नाराज आमदार काही दिवस रडतील, त्यांना हातात एखादं खेळणं दिलं जाईल, आणि सगळे शांत राहतील, असंही राऊत म्हणाले.
मंत्रीमंडळातले हे नग, नमुने घेऊन फडणवीस…
पण मला आश्चर्य वाटतं, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे नमुने, नग आहेत, त्या संदर्भात फडणवीसांनीच अभ्यास केला पाहिजे. काही वर्षांपूर्वी याच नमुन्यांबद्दल, नगांबद्दल, त्यांच्याविषयी आपण काय भूमिका घेतली होती, काय संशोधन केलं होतं, किती प्रकारचे भ्रष्टाचाराचे पेपर त्यांच्यासदंर्भात तुम्ही राज्यपालांकडे सोपवले होते.. हे सगळे नग आणि नमुने घेऊन फडणवीस राज्य करत आहेत. आता ते आदर्श कारभार करणारा आहेत, असं मी वाचलं, ते वाचून आमचं मनोरंजन झालं असा टोला राऊतांनी लगावला.