सुंभ जळाला, पीळही जाईल.. जनतेने मोदींना जमिनीवर आणले – ‘सामना’तून घणाघाती टीका

| Updated on: Jun 26, 2024 | 8:29 AM

मोदी यांनी शब्दास जागावे व लोकसभेचे उपाध्यक्षपद 240 संख्याबळ असलेल्या मजबूत जबाबदार विरोधी पक्षाला द्यावे. तर मोदी खरे. त्यांच्यात बदल होत आहे हे मान्य करू, नाहीतर सुंभ जळूनही पीळ कायम असेच म्हणावे लागेल.

सुंभ जळाला, पीळही जाईल.. जनतेने मोदींना जमिनीवर आणले - सामनातून घणाघाती टीका
Follow us on

दीडशे खासदारांचे निलंबन करणाऱ्या ओम बिर्ला यांनाच पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी बसवणे हा लोकशाहीचा अपमान मोदी करतात व पुन्हा देशाला आणीबाणीची आठवण करून देतात. शिवसेनेचं ( उबाठा गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीकास्त्र डागण्यात आलं आहे. त्याच वेळी सर्वांना सोबत घेऊन जाऊ अशी भाषा करतात. तसे असेल तर मोदी यांनी शब्दास जागावे व लोकसभेचे उपाध्यक्षपद 240 संख्याबळ असलेल्या मजबूत जबाबदार विरोधी पक्षाला द्यावे. तर मोदी खरे. त्यांच्यात बदल होत आहे हे मान्य करू, नाहीतर सुंभ जळूनही पीळ कायम असेच म्हणावे लागेल. अर्थात सुंभ जळालाच आहे, पीळ वरवरचा आहे. हा पीळही जाईल.मोदींनी त्यांच्या दोन उद्योगपती मित्रांना मालामाल करण्यासाठी सार्वजनिक उपक्रम विकायला काढले. विरोधी पक्ष व त्यांच्या नेत्यांचाही लिलाव केला, पण शेवटी जनतेने मोदी व त्यांच्या लोकांना जमिनीवर आणले, अशी टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात ?

विरोधी पक्षाला खतम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदींनी वापर केला. मोदी हे हुकूमशहा आहेत व मागच्या दहा वर्षांत त्यांना पाशवी बहुमताचा अहंकार चढला होता, अशी टीका ‘सामना’ च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

सामनाचा अग्रलेख जसाचा तसा..

‘‘कोण राहुल गांधी?’’ अशी चेष्टा करणाऱ्या मोदींना राहुल यांना ‘राम राम’ करावं लागलं..

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी संसदेत व बाहेर दहा वर्षे जे केले त्यास ‘नौटंकी’ असेच म्हणतात. आता तेच मोदी बहुमत गमावल्यावर थोडे जमिनीवर आले व संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बोलून गेले की, ‘‘देशाच्या जनतेला संसदेत नौटंकी, हंगामा, नारेबाजी नको आहे. त्यांना एक चांगला आणि जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे.’’ मोदी यांनी हे सांगणे म्हणजे हुकूमशहाने गीता वाचण्यासारखेच आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी व त्यांच्या गुजराती ईस्ट इंडिया कंपनीने देश चालविण्याच्या नावाखाली उत्सव, इव्हेंट, नाटकेच केली. मोदी आता म्हणतात की, देशाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा, पण दहा वर्षांत विरोधी पक्ष फोडून त्यांना कमजोर करण्याचे काम मोदी यांनीच केले. देशात विरोधी पक्ष टिकूच द्यायचा नाही. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व बाहेर जे कोणी देशाच्या व जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतील अशांना भाजपात आणायचे किंवा तुरुंगात टाकायचे. हे मोदी यांचे धोरण विरोधी पक्ष मजबूत करण्याचे होते काय? विरोधी पक्षाला खतम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदींनी वापर केला. प. बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबले. कारण ते भाजपविरोधी होते. विरोधी पक्षाचा आवाज जपला पाहिजे, देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे असा साक्षात्कार गेल्या दहा वर्षांत मोदी यांना झाला नाही. मोदी हे हुकूमशहा आहेत व मागच्या दहा वर्षांत त्यांना पाशवी बहुमताचा अहंकार चढला होता. कालच्या लोकसभेत मोदी व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीने बहुमत गमावले. लोकांनी त्यांना कुबडय़ांवर आणले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत आल्यावर मोदी यांना लोकशाही वगैरेची आठवण झाली. ‘‘कोण राहुल गांधी?’’ अशी चेष्टा करणाऱ्या मोदींना सोमवारी खासदारकीची शपथ घेताना पहिल्या बाकावर बसलेल्या राहुल गांधी व अखिलेश यादव यांना ‘राम राम’ घालून पुढे जावे लागले. हे देशात मजबूत विरोधी पक्ष अवतरल्याचे लक्षण आहे.

वेदनेच्या कळा मोदी व अमित शहांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत

अर्थात, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही याप्रमाणे मोदींचे वागणे आहे. मोदी यांनी दहा वर्षांत लोकसभेत विरोधी पक्षनेता बनू दिला नाही. विरोधी पक्षनेत्यांशिवाय संसद चालवली. आता विरोधकांचे बळ इतके प्रचंड आहे की, मोदींच्या ईस्ट इंडिया कंपनीने कितीही आपटली तरी लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची निवड ते रोखू शकत नाहीत व त्याच वेदनेच्या कळा त्यांच्या व अमित शहांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. विरोधी पक्षाच्या नावाने डबडे वाजवणाऱ्या मोदी यांनी लोकसभा व राज्यसभेतून एकाच झटक्यात दीडशेच्या आसपास खासदारांना निलंबित केले होते आणि त्या रिकाम्या सदनात मोदी स्वतःच्या चमच्यांकडून बाके वाजवून घेत होते. हे चित्र आणीबाणीपेक्षा काळेकुट्ट होते. मोदी आजही काँग्रेसला आणीबाणीची आठवण करून देतात हा नौटंकीचाच एक भाग आहे. मोदींनी मागच्या दहा वर्षांत देशाची मुस्कटदाबी केली. भय व भ्रष्टाचाराचे शासन चालवले. न्यायालये, राष्ट्रपती भवन, निवडणूक आयोग, केंद्रीय यंत्रणा, भारताचे क्रिकेट बोर्ड, केंद्रीय परीक्षा यंत्रणा पूर्णपणे ताब्यात घेऊन मनमानी पद्धतीने राज्य केले. आणीबाणीत इतकी वाईट परिस्थिती नव्हती.

‘नीट’ परीक्षा घोटाळय़ाने मोदी व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. त्या घोटाळय़ावर मोदी नेहमीप्रमाणे चूप आहेत, पण लोकशाहीवर मात्र ते प्रवचने झोडत आहेत. मोदी यांनी इशारा दिला आहे की, विरोधकांचे संख्याबळ वाढले असले तरी सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. पंतप्रधान महोदयांना संसदीय लोकशाहीचे संकेत माहीत असते तर त्यांनी हे असे इशारे दिले नसते. नीट परीक्षा प्रकरणात पेपर फुटले आहेत व त्यात भाजपची बडी धेंडे सहभागी आहेत. लाखो विद्यार्थी व त्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. या प्रकरणी शिक्षणमंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करीत असतील तर ते त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मोदी यांना हा दबाव वाटतो व त्यामुळे ते विरोधकांना दमबाजी करू लागलेले दिसतात.

हा तर लोकशाहीचा अपमान

दीडशे खासदारांचे निलंबन करणाऱ्या ओम बिर्ला यांनाच पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी बसवणे हा लोकशाहीचा अपमान मोदी करतात व पुन्हा देशाला आणीबाणीची आठवण करून देतात. त्याच वेळी सर्वांना सोबत घेऊन जाऊ अशी भाषा करतात. तसे असेल तर मोदी यांनी शब्दास जागावे व लोकसभेचे उपाध्यक्षपद 240 संख्याबळ असलेल्या मजबूत जबाबदार विरोधी पक्षाला द्यावे. तर मोदी खरे. त्यांच्यात बदल होत आहे हे मान्य करू, नाहीतर सुंभ जळूनही पीळ कायम असेच म्हणावे लागेल. अर्थात सुंभ जळालाच आहे, पीळ वरवरचा आहे. हा पीळही जाईल. हा देश महान आहे.

मोदींच्या नौटंकीतून प्रभू श्रीरामही सुटले नाहीत

अयोध्येत राममंदिराचे राजकीय उद्घाटन केले. त्या राममंदिरास पहिल्याच पावसात गळती लागली व संपूर्ण अयोध्या नगरी पावसामुळे तुंबली आहे. मोदी व त्यांच्या लोकांनी केलेल्या नौटंकीतून प्रभू श्रीरामही सुटले नाहीत. पुलवामा हत्याकांडातील जवानांच्या नावाने 2019 साली मते मागण्याची नौटंकी करणारे हेच लोक आहेत व त्याबद्दल त्यांना काहीच लज्जा वाटली नाही. मोदी सरकारच्या दहा वर्षांत देशातील लोकशाही, स्वातंत्र्य, संविधानाची पुरती गळचेपी झाली. लोकशाहीचे खासगीकरण केले गेले. मोदींनी त्यांच्या दोन उद्योगपती मित्रांना मालामाल करण्यासाठी सार्वजनिक उपक्रम विकायला काढले. विरोधी पक्ष व त्यांच्या नेत्यांचाही लिलाव केला, पण शेवटी जनतेने मोदी व त्यांच्या लोकांना जमिनीवर आणले.

त्यामुळे आता लोकसभेत मोदी यांना मनमानी करणे शक्य नाही. लोकशाहीचे चौकीदार म्हणून संसदेत मजबूत आणि जबाबदार विरोधी पक्ष बसला आहे व हे चौकीदार चोर नाहीत. त्यामुळे मोदी व त्यांच्या ईस्ट इंडियाची बाजू आता कमजोर पडली आहे. मोदी यांच्या नौटंकीस लगाम घालणारी ताकद त्यांच्या समोरच्या बाकावरच आहे. मोदी यांचे रडणे, नकला करणे, चित्रविचित्र हावभाव करून छाती पिटणे, गरीबांचे कैवारी असल्याचे ढोंग रचणे हे सर्व नाटक बंद करणारा जबाबदार विरोधी पक्ष जनतेने संसदेत पाठवला आहे. मोदी व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे दुखणे तेच आहे. राहुल गांधी यांचे पहिल्या बाकावरच दर्शन घेऊन ‘राम राम’ करून मोदी यांना रोज पुढे जावे लागेल. मागील दहा वर्षे देशात सुरू असलेली नौटंकी कोसळण्याची ही सुरुवात आहे.