महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काही आलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी, महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्यात आलं. त्या तिनही पक्षांमध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांना तर कोणी विचारतच नाही. मुख्यमंत्र्यांनी तर अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. अमित शाह हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत, असं दिसतंय. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू शकतं, अशी घणाघाती टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
महायुतीची मंत्रीमंडळाची बैठक पार पडली, त्यावेळी नेत्यांमध्ये काहीच आलबेल नाही, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावरून राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी खोचक टीका करत हे उत्तर दिलं.
कुणाचा पायपोस कुणाच्याही गळ्यात-पायात नाही अशी परिस्थिती आहे. पहिल्यापासूनच हे सरकार एकमेकांच्या छाता़ावर बसलं आहे. अमित शाहांना फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कमजोर करायचं आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी तोडली आणि त्याच उद्देशाने महायुतीचं हे सरकार तोडलं.असं सरकार एकदिलाने काम कसं करेलं ? असाही प्रश्न राऊतांनी विचारला.
इतकं खादाड सरकार कधी पाहिलं नाही
हे सगळे खा-खा खाणारे लोक आहेत, ते देवीची पूजा वगैरे करतात पण इतकं खादाड सरकार आम्ही कधी पाहिलं नाही. 40 टक्के कमीशन खातात. सगळे मिस्टर 40% आहेत. मुख्यमंत्री, अजित पवार 40% तर देवेंद्र फडणवीस 50%… यात राज्याला काय मिळतं ? या
कमिशनबाजीमुळे यांचं आपापसांत पटत नाही, प्रत्येकाला निवडणुकीमध्ये वारेमाप पैसा हवा आहे. इतर राज्यांच्या निवडणुकीचा खर्च करायचा ही जबाबदारी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांवर आहे. इतके पैसे कुठून आले ? म्हणजे महाराष्ट्रात लूटच लूट सुरू असा आरोप राऊत यांनी लावला.
दसरा मेळावा कुठे ?
मुंबईत अचानक पावसाने हजेरी लावल्याने शिवसेनेचा (उबाठा गट) दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही, जागा बदलणार, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मात्र दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. पाऊस पडून गेला आहे, आता उन्हाची प्रतिक्षा आहे. आम्ही तिथे काम सुरू केलं आहे. उद्या मा. उद्धव ठाकरे देशाला आणि महाराष्ट्राला संबोधित करतील आणि शीवतीर्थावरूनच उद्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात येईल, असंही राऊत म्हणाले.