पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन, पोलंड आणि रशियाच्या दौऱ्यावर आहेत. जगभरातील नेत्यांशी संवाद साधत आहे. जगातील काही देशात युद्ध सुरू आहे. मात्र, हे युद्ध जगाला परवडणारे नाही. जगात शांतता नांदली पाहिजे, त्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत. मोदी यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. मोदींची 25 तारखेला जळगावात सभा आहे. त्यांना येऊ द्या. पण त्यांना महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या आणि कांद्याचे प्रश्न विचारू नका. ते विश्वगुरू आहेत. विश्वगुरूला त्यांच्या गावातील प्रश्न विचारायचे नसतात. नाही तर त्यांची तपस्या भंग होता, असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधिक टीका केली. मोदींसमोर मोठे मोठे प्रश्न आहेत. आता ते पोलंडला आहेत. त्यांनी तिथे युद्धावर भाष्य केलं. तिथून ते युक्रेनच्या युद्धभूमीवर जाणार आहेत. तो त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. रशियात जाऊन पुतीनबरोबर चहा पिऊन आले. हे कांद्याचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न हे काही त्यांचे काम आहे? खूप मोठी व्यक्ती आहे ती. ते काय लहानसहान प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान झाले आहेत काय?, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला.
जग काय म्हणेल?
होऊ द्या अत्याचार, मरू द्या शेतकरी. पोलंडला जाऊन ते भाषण करतात. तुम्हाला काही वाटलं पाहिजे. त्यांनी तिकडे बुद्धावर भाष्य केलं. जगात शांतता नांदली पाहिजे असं म्हणाले. इथे शेतकरी अशांत राहू द्या. मणिपूर अशांत राहू द्या, कधी युक्रेनला जाणार. पुतीनसोबत चहा पिणार. तुम्ही लहान सहान प्रश्न विचारून त्यांचा अपमान करत आहात. युक्रेनमध्ये अत्याचार होत आहे. त्यामुळे ते तिथे गेले आहेत. ते विश्वगुरू आहेत. विश्वगुरूला त्यांच्या गावातील प्रश्न विचारायचे नसतात. ते महामानव विश्वगुरू आहेत. त्यांना लहानसहान प्रश्न विचारले तर त्यांची तपस्या भंग होते. असं करू नका. छोट्या छो़ट्या गोष्टी विचारल्या तर जग काय म्हणेल? विश्वगुरूही नाराज होतील, असा उपरोधिक हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
शिंदे खोटं बोलतात
संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात हे गांभीर्याने घेऊ नका. त्यांना दोन महिने सहन करा. त्यांनी फाशीबाबतचं विधान केलं. अंगाशी आल्यानंतर कुणी तरी त्यांना माहिती पुरवली. तीही बरोबर नाही, असं सांगतानाच महायुतीतील गद्दार आमदार विधानसभेत दिसणार नाहीत. लोक त्यांना पुन्हा निवडून देणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय.