Uddhav Thackeray On Chief Minister Post : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सध्या सर्वच पक्ष हे महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. त्यातच आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठीची जोरदार तयारी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. नुकतंच उद्धव ठाकरेंची शिर्डीत एक जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरुन एक महत्त्वाचे विधान केले. त्यासोबतच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झालं ते तुमच्यासोबतही होईल, असा सावधगिरीचा इशाराही यावेळी दिला.
जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो. तुमच्यासमोर येण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घेतलं. आमच्या बहिणींना भावांना न्याय द्या, असं साकडं साईबाबांकडे घातले. मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो. तुमचा आक्रोश हा सरकारच्या कानी जात नाही. मी माजी मुख्यमंत्री आहे. माझा पक्ष चोरलाय, चिन्हं चोरलंय आणि वडील पण चोरलेत, तरी तुम्ही माझ्याकडे मागताय. त्यानंतर मला दिवारचा डायलॉग आठवला? मेरे पास ईमान है, विश्वास है. तुम्हाला कल्पना आहे की माझ्या हातात काहीही नाही. तरीही तुम्ही मला बोलवत आहात. मी देखील आलो आहे. कारण मला सत्तेची पर्वा नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेलेली सत्ता परत येते आणि जाते, नक्की येणार, खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार आहे. त्यामुळे एकजूट ठेवा. फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झालं ते तुमच्यासोबतही होईल. यांना पेन्शन नाही, टेन्शन द्यायला हवं. उपोषणाची हाक दिली पण ते करू नका. आपलं आंदोलन असं असायला हवं की हे सत्तेशिवाय उपाशी राहायला हवेत, हा निर्धार करा. आंदोलन पेटल्यानंतर चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सर्व मिळून अमलात आणल्याशिवाय राहायचं नाही. निवडणूक होईपर्यंत ज्यांना बहीण आहे हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण आणली, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
“आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर सरकारने पेन्शन योजनाची मान्य केली तर तुम्ही काय करणार? निवडणुकीला दोन महिने शिल्लक आहेत. तुम्ही जर आमचं सरकार आणलात तर मी तुमची मागणी मान्य करतो. ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली, जर हे स्वत:च्या शिवसेना या आईवर वार करु शकतात, हे तुमच्यावर वार करणार नाहीत. त्यामुळे मला हे सरकार नको आहे. माझं मुख्यमंत्री व्हायचंय स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही पडत नाही. मी सत्तेतून रिटायर होणार नाही. मला सत्तेतून रिटायर कोणीही करु शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात, तोपर्यंत मला कोणीही रिटायर करु शकत नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.