बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या प्रचंड गाजतंय. त्यांच्या हत्येला 17 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप सर्व आरोपींना अटक झाली नसून तीन जण अद्याप फरार आहेत. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. याच दरम्यान बीडमध्ये मोठ्या प्रमाणात बंदुकांचे परवाने कोणाच्या आशीर्वादाने देण्यात आले असा सवालही विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सभागृहामध्ये या मुद्यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबद्दल ट्विट करत धक्कादायक आकडेवारी समोर आणली होती. बीड जिल्ह्यामध्ये परवाने नसतानाही अनेक जण बंदूका वापरत असल्याचं दमानिया यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं होतं. तर बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे असा मोठा आरोप सुरेश धस यांनी केला होता.
याच मुद्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका शिलेदारानेही सरकारला धारेवर धरलं आहे. बीडमध्ये हजारो पिस्तुल परवाने मागितले का जात आहेत? त्या पिस्तुलाच्या परवाना शिफारशींमागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? ‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण ? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस असलेल्या अखिल चित्रे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधीच मनसेची साथ सोडून ठाकरे गटाचं शिवबंधन हातात बांधलं होतं. अखिल चित्रे यांनी ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. त्याच अखिल चित्रे यांनी ‘X’ या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अकाऊंटवरून एक ट्विट करत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.
काय आहे अखिल चित्रे यांचं ट्विट ?
‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण ?
‘ बीडमध्ये हजारो पिस्तुल परवाने मागितले का जात आहेत? त्या पिस्तुलाच्या परवाना शिफारशींमागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? हेच पिस्तुलधारी गुंड, त्याची २०-२२ वर्षाची पोरं सणाला हवेत गोळीबार केल्याचे व्हिडीओ व्हायरल करतात पण त्यांच्यावर कारवाई का नाही?’ असा सवाल चित्रे यांनी विचारला आहे.
तसेच ‘ हे पिस्तुलधारी विरोधकांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात, पोलिसांशी अरेरावी करतात, कमरेला पिस्तूल लावून फिरतात… बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या ह्या गुंडांचा ‘धनी’ महायुती सरकारला का सापडत नाही? राज्य सरकार कुणाला पाठीशी घालत आहे? आणि का? असा हा कोण माणूस आहे जो महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेपेक्षा मोठा आहे? तो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहे का? तसं असेल तर महाराष्ट्राने कारवाईची अपेक्षा करूच नये का? हे सर्व प्रश्न महाराष्ट्र जंगलराजच्या दिशेने जातोय कि काय अशी परिस्थिती निर्माण करत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री सन्मा. देवेंद्रजी उत्तर द्या ! ‘ अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
‘गैंग्स ऑफ बीड’चे धनी कोण..
बीडमध्ये हजारो पिस्तुल परवाने मागितले का जात आहेत? त्या पिस्तुलाच्या परवाना शिफारशींमागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? हेच पिस्तुलधारी गुंड, त्याची २०-२२ वर्षाची पोरं सणाला हवेत गोळीबार केल्याचे व्हिडीओ व्हायरल करतात पण त्यांच्यावर कारवाई का नाही? हे… pic.twitter.com/BQKbKVXfrS— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 25, 2024