“मनसे आता गुनसे झालीय… गुजरात नवनिर्माण सेना”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला, म्हणाले “माहीमची जागा…”

| Updated on: Nov 17, 2024 | 9:20 AM

"शिवसेनेची मशाल पेटवून गद्दारांचा हा भ्रष्ट कारभार जाळून भस्म करा आणि ठाण्यावर लागलेला गद्दारीचा कलंक कायमचा पुसून टाका" असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

मनसे आता गुनसे झालीय... गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला, म्हणाले माहीमची जागा...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
Follow us on

Uddhav Thackeray On MNS : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात एक प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंवरही टीका केली. “आताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. हा महाराष्ट्र मिंधे-भाजपने खड्डय़ात घातला आहे. आता जर चुकलो तर हा महाराष्ट्र कायमचा खड्ड्यात गेलाच म्हणून समजा”, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यांनी ऐरोलीचे उमेदवार एम.के. मढवी, कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ओवळा-माजीवडय़ाचे उमेदवार नरेश मणेरा आणि ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील गडकरी चौकात सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपसह शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला. “शिवसेनेची मशाल पेटवून गद्दारांचा हा भ्रष्ट कारभार जाळून भस्म करा आणि ठाण्यावर लागलेला गद्दारीचा कलंक कायमचा पुसून टाका” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

“…तर महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल”

“शिवसेनेचे ठाणे व ठाण्याची शिवसेना हे नाते तुम्ही ठाणेकरांनीच जोडले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे म्हणून सर्वत्र ओळखले जाते. पण मिंध्यांनी ठाण्याला गद्दारीचा कलंक लावला. मिंध्यांच्या बुडाला मशाल लावली तर महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली.

“दाढीवाल्या, तू होशील का उपमुख्यमंत्री”

“अमित शहा यांनी सत्ता आली तर भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली. यावरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर टीका केली. मग दाढीवाल्याला विचारा की, जसे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले तसे दाढीवाल्या, तू होशील का उपमुख्यमंत्री”, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

“मागच्यावेळी बिनशर्ट पाठिंबा, आता…”

यावेळी सभेत उद्धव ठाकरेंनी मनसे आणि राज ठाकरेंवरही टीका केली. “गुजरातला हे लोक ढोकळा खायला गेले. ठाण्यातली मिसाळ खायची ना…काही लोकांना खूप आवडते मिसळ खायला. मागच्यावेळी बिनशर्ट पाठिंबा दिला. आता इनशर्ट पाठींबा दिला”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“मला विचारतात एक जागा का सोडली नाही?, मी का सोडू, यांना लुटायला सोडायची का?, कोणत्याही लुटणाऱ्या लोकांना जागा सोडणार नाही. या ठिकाणी तुम्ही मत आता दुसऱ्यांना दिला तर आता आपलं खरं नाही. आपण गुनसेला मत देणार का?, गुजरात नवनिर्माण सेना…आता मनसे नाही राहिली, गुनसे झाली. महाराष्ट्र गद्दारांचा कडेलोट करतो आणि तो या निवडणुकीत होणारच”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.