“शिवसेना दोन गटात विभागली असली तरी शिवसैनिक मात्र एकच”, ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विधानाने उंचावल्या भुवया

| Updated on: Oct 28, 2024 | 1:18 PM

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या घटनेचा दाखला देत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शिवसेना दोन गटात विभागली असली तरी शिवसैनिक मात्र एकच, ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विधानाने उंचावल्या भुवया
Follow us on

Dhananjay Bodare Kalyan East Constituency : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकीकडे सर्वच पक्ष उमेदवार घोषित करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे नावाची घोषणा झालेले उमेदवार हे घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांनी एक वक्तव्य केले आहे. शिवसेना दोन गटात विभागली असली तरी शिवसैनिक मात्र एकच आहे, असे विधान धनंजय बोडारेंनी केले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

धनंजय बोंडारे यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याबद्दल भाष्य केले. “भाजपाच्या आमदारांनी ज्याच्यावर गोळीबार केला, तो शिवसैनिकच आहे. शिवसैनिकाच्या रक्ताचा बदला शिवसैनिक यंदा कल्याण पूर्वेत मशाल पेटवून घेतील”, असं धनंजय बोडारे म्हणाले.

“सध्या परिस्थिती बदलली असली, शिवसेना दोन गटात विभागली असली, तरी शिवसैनिक मात्र एकच आहे. पोलीस ठाण्यात भाजपा आमदारांनी ज्याच्यावर गोळीबार केला, तो देखील शिवसैनिकच आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या रक्ताचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे. हा बदला शिवसैनिक मशाल पेटवून घेतील”, असं धनंजय बोडारे म्हणाले.

शिंदे गटाचे शिवसैनिक काय भूमिका घेणार?

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या घटनेचा दाखला देत बोडारे यांनी हे वक्तव्य केलं आहे. या गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड हे जेलमध्ये असले, तरीही भाजपाने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता शिवसैनिकाच्या रक्ताचा वचपा काढण्याची वेळ आली आहे, असे धनंजय बोडारे म्हणाले. यावर आता शिंदे गटाचे शिवसैनिक काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. माजी महापौर रमेश जाधव यांनी या निवडीविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी केली आहे. त्यांच्यासह ठाकरे गटातील अन्य कार्यकर्त्यांनीही बोडारे यांच्या उमेदवारीबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.