Uddhav Thackeray On Ladki Bahin Yojana : “शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. हे दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत. या लुटीतून जाहिरातबाजी करत आहेत. फेक नरेटिव्ह जाहिरातीच्या माध्यमातून दाखवत आहेत. खोटे आकडे दाखवून जाहिरात करत आहेत. एसटीवर जाहिरात केली जात आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली. १५०० देऊन घरी बसवली. कारण रोजगार नाही”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत झालेल्या राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत जोरदार भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना आणि रोजगाराच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. “किती काळ माझी बहीण १५०० रुपये घेऊन तिच्या बेकार भावाला सांभाळणार आहे. हे? किती काळ माझी आई १५०० रुपये घेऊन तिच्या बेकार मुलाला सांभाळणार आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
कोरोना काळात मी केलेलं काम मी केलंय. ते पाहा. त्यात कमी असेल तर मी तोंड दाखवणार नाही. कोरोना काळात घोटाळा झाला असं म्हणता अरे तुमच्या पीएम केअर फंडचं काय झालं. त्या घोटाळ्यावर बोला. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. हे दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत. या लुटीतून जाहिरातबाजी करत आहेत. फेक नरेटिव्ह जाहिरातीच्या माध्यमातून दाखवत आहेत. खोटे आकडे दाखवून जाहिरात करत आहेत. ५० कोटी लोकांना गॅस सिलिंडर दिल्याचं सांगतात. प्रत्येकाला वाटतं कुणाला तरी मिळालं असेल त्याला मिळालं असेल, असंच सुरू आहे. प्रत्यक्षात कुणाला काही मिळालेलं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एसटीवर जाहिरात केली जात आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली. १५०० देऊन घरी बसवली. कारण रोजगार नाही. काम देता येत नाही. महिलांच्या रोजगारावर काही बोलत नाही. शिक्षणाचा उपयोग काय मग? कोरोना काळात सामांजस्य करार झाले होते. अनेक उद्योगधंदे येणार होते. गद्दारी करुन सरकार पाडल्यावर सर्व उद्योग गुजरातला गेले. हे वास्तव आहे. तुम्ही आमच्या सुखात का मीठ कालवत आहात? का भेदभाव करताय? हे वैमनस्य का वाढवताय? असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
“सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. मग आज तीच वेळ आली आहे. मराठी म्हणजे आम्ही आहोतच, पण तुम्ही आता म्हणालात की तुमचीही मातृभाषा मराठी आहे. हे सर्व इथे जन्मलेले आहेत आणि वर्षानुवर्षे इथे राहत आहेत, त्यांना आम्ही मराठी मानतो आहोत. पण ते मराठी मानून आमच्यासोबत येत आहेत की नाही हा प्रश्न त्यांनाही विचारण्याची गरज आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“राज्य संकटात असताना, लुटले जात असताना मला महाराष्ट्राचा अभिमान वाटतो कारण संपूर्ण देशात लोकसभेत या महाराष्ट्राने मुजोर सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावर आणलं., याचा मला खरंच अभिमान वाटतो. नाहीतर ४०० पार काय, ५०० पार काय, १००० पार काय, नुसतं आरपार सुरु होतं. पण त्यांना गुडघ्यावर आणण्याचे काम करु शकला तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र….तोच महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र यायचं आहे”, असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी केली.
“आम्ही जाहीरनामा किंवा आग्रहनामा असे न म्हणता वचननामा वापरतो. आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो आणि करणार असतो तेच बोलतो. अनेक योजना आहेत, पण धोरणचं नाही. साडी वाटप, १५०० रुपये दे या योजनांचा परिणाम काय होणार आहे? किती काळ माझी बहीण १५०० रुपये घेऊन तिच्या बेकार भावाला सांभाळणार आहे. हे? किती काळ माझी आई १५०० रुपये घेऊन तिच्या बेकार मुलाला सांभाळणार आहे. त्याला नोकरी नाही, शिक्षण कसं देणार, घरं कसं चालवणार… आम्हाला हक्काचं हवं आहे. हक्काचं मागाल तर ईडी, इन्कम टॅक्सचे धाड टाकू. आम्ही देतोय ती भीक घ्या आणि गपचूप पडून राहा. आमच्या शब्दाबाहेर जायचं नाही. ही मुजारी आमचा महाराष्ट्र सहन करणार नाही. ही क्रांतीची सुरुवात आहेत. आता बॅलेटने क्रांती होऊ शकते. ती करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे”, अशीही साद उद्धव ठाकरेंनी घातली.