राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता छगन भुजबळांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यामुळे ते लवकरच बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यातच आता शिवेसना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी एक मोठे विधान केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना छगन भुजबळांच्या नाराजीवर प्रश्न विचारण्यात आला. तसेच ते तुमच्या संपर्कात आहेत का, असेही त्यांना विचारण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिले.
“छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही, हे ऐकून मला फार वाईट वाटलं. भुजबळांसह अनेकांबद्दल मला वाईट वाटले. काही लोक फार अपेक्षेने गेले होते. तरी बरं काही लोकांना घट्ट झालेले जॅकेट घालायला मिळाले. असे काही जणांचे जॅकेट अजूनही वाट बघत असतील. त्या सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्ती करतो. लाडका आमदार किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का?” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
यानंतर उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांनी केलेल्या “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना” या वाक्यावरही प्रतिक्रिया दिली. “या सरकारची झालीय दैना, त्यामुळे तिथे काही चैना, मैना, दैना काहीही होणार नाही. वहाँ नही रहैना हे मात्र त्यांचं अत्यंत योग्य आहे. छगन भुजबळ या विषयावर संपर्कात नाही. पण नेहमी संपर्कात असतात. सुधीर भाऊ मुनगंटीवार… बोलूया”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“नागपूर ही संत्रा नगरी होती. ती होर्डिंग नगरी झाली आहे. विजयाचे शिल्पकार, कर्णधार कोण हे दिसून येत नाही. मित्र पक्षांचा महायुतीने वापर करून घेतला आहे. नाराज आमच्या संपर्कात आहे. निरोप येत आहे. त्यांना अनुभव येऊ द्या. अनुभवासारखा उत्तम गुरू नसतो. त्यांना धडे मिळू द्या. नंतर सुधारल्यावर बघू”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“दरवर्षी अनिल परब आणि संजय पोतनीस सुप्रीमो चषक घेतात. फिरता चषक असतो. आता मंत्रीपदं फिरते असतील. ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते. आणि जे झाले ते कायम. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षाने बदलणार का. त्यांना बदलण्याचं ठरलंय का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी उद्धव ठाकरेंना अजित पवार नॉट रिचेबल झाल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी अजित पवारांची सवय जुनी आहे”, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.