सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 10 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राऊत कार्यक्रम आटोपून जात असताना त्यांच्या दिशेने चप्पल असणारी पिशवीच भिरकावण्यात आली. सुदैवाने यातून राऊत बचावले. मात्र, शिवसैनिकांचा प्रचंड गराडा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि राऊत यांचे अंगरक्षक असतानाही त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा चप्पल फेकून मारणारा मीडियासमोर आला असून त्याने धक्कादायक विधान केलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर चप्पल भिकावणाऱ्याचं नाव सागर शिंदे असं आहे. सागर शिंदेने टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत असतात. त्याचबरोबर मराठा मूक मोर्चाला मुक्का मोर्चा असे संजय राऊत यांनी हिणवले होते. या सर्व गोष्टीचा राग माझ्या मनात होता म्हणून मी आज चप्पल फेकली, असं सागर शिंदेने म्हटलं आहे.
मला तिथे केवळ चपल्या सापडल्या. त्यामुळे मी चप्पल फेकली. या पुढच्या काळात राऊत जिथे दिसतील तिथे त्यांच्यावर दगड फेकणार आहे, असा संतप्त इशारा सागर शिंदे याने दिला आहे. सागर शिंदे याच्या या इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापुरात दिवसभराचे कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या हस्ते एका हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. उद्घाटनानंतर संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राऊत जायला निघाले. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून त्यांच्याशी संवाद साधत राऊत त्यांच्या गाडीपर्यंत आले. कारमध्ये बसल्यानंतर राऊत यांची गाडी थोडी पुढे गेली. गर्दी असल्यामुळे स्पीड कमी होती. त्यानंतर अचानक गाडीच्या टपावर कुणी तरी एक पिशवी भिरकावली. या पिशवीत चपला होत्या. सागर शिंदे यांनी चपला भिरकावून नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि तिथून पळ काढला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने राऊत कारमध्ये होते, त्यामुळे त्यांना काही झालं नाही.