सातारा । 7 ऑगस्ट 2023 : राज्यात पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असला तरी सातारा जिल्ह्यातील काही भागात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे येथील बळीराजा चिंतेत आहे. पावसाने दडी मारल्याने यावर्षी पीक जोमाने येईल की नाही याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, ज्या योजना आहेत, सुविधा दिल्या आहेत त्या केवळ कागदावरच आहेत. शेतकऱ्यांच्या दारापर्यंत या योजना पोहोचत नाहीत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट पत्र लिहिले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात दुधनवाडी गावात रहाणारे शेतकरी धन्यकुमार जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिले आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री कक्षात त्यांनी हे पत्र दिले असून यामध्ये त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत.
माझी अल्प मुरमाड डोंगरी भागात शेती आहे. पण, शेतीमधून काहीच उत्पन्न मिळत नाही. गायी म्हशी पाळून त्यांचे दूध काढतो. त्यालाही योग्य दर मिळत नाही. कोरेगावमधील बनवडी सोसायटीमधून मी कर्ज घेतले. परंतु, शेतीमधून काहीच उत्पन्न येत नसल्यामुळे हे कर्ज फेडता आले नाही. कर्ज माफी योजनेसाठी शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. पण, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून कर्ज फिटत नाही. दुसरीकडे बनवडी सोसायटीचे सचिव वसुलीसाठी तगादा लावत आहेत. काही वन्यप्राणी शेतीचे नुकसान करतात. त्याचीही नुकसान भरपाई मिळत नाही. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मला मिळत नाही असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
आमदार, खासदार, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात. त्यांना भत्ते, सुविधा मिळतात. पण, शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या फक्त कागदावरच आहेत. आम्हा शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळणार नसेल तर शासनाने आमच्या संपूर्ण कुटुंबास आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी धन्यकुमार जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.