शोलेचा जेलर, देवानंद आणि जॉनी लिव्हर, महाराष्ट्राचे राजकारण तापले, झाली बॉलीवूड अभिनेत्यांची एन्ट्री

| Updated on: Apr 02, 2024 | 12:03 AM

महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी आता बॉलिवूड कलाकारांच्या नावांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. निवडणूक काळात विरोधी पक्षावर तुटून पडताना कोणी शोले चित्रपटाचा उल्लेख करत आहे तर कोणी कुणाला जॉनी लीव्हरची उपमा देत आहे.

शोलेचा जेलर, देवानंद आणि जॉनी लिव्हर, महाराष्ट्राचे राजकारण तापले, झाली बॉलीवूड अभिनेत्यांची एन्ट्री
uddhav thackeray, sanjay raut and nitesh rane
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे काही उमेदवार निश्चित झाले आहेत. तर काही उमेदवारांची नावे जाहीर करणे बाकी आहे. मात्र, निवडणुकीच्या या वातावरणात राजकीय आरोपांची राळ उठविण्यास सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठ येथील सभेत विरोधकांना इशारा दिला. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली. त्यांच्या एका विधानावरून राज्यातले वातावरण तापले आणि मग विरोधकांनीही त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करण्याची संधी सोडली नाही. मात्र, या टोलवाटोलवीत एका नेत्याची तुलना बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांशी करताना पहायला मिळाली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठ येथील भाजपाच्या जाहीर सभेत भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना राऊत यांनी “मोदी यांनी हा सर्वात मोठा जोक केला आहे. ते दररोज असा एक विनोद करत आहेत. त्यांचे विनोद ऐकले की वाटतं. देशात जॉनी लीवरनंतर कोणी मोठा विनोदी कलाकार असेल तर ते मोदी आहेत. हा गुजरातचा लीवर आहे, जो आमचं मनोरंजन करतोय.’ अशी टीका केली होती.

खासदार संजय राऊत यांची ही टीका भाजपला चांगलीच झोबली. भाजप आमदार नितेश राणे यांनी या टीकेला उत्तर देताना राऊत यांना ‘भांडुपचे देवानंद’ म्हटले. नितेश राणे यांनी ‘औरंगजेबाचा प्रश्न सुटला आहे, औरंगजेबावर कोण प्रेम करतो हे महाराष्ट्राला माहीत नाही का? त्याला संजय राऊत कधी उत्तर देणार? भांडुपचे देवानंद यांना छत्रपती संभाजी नगरमध्ये बोलताना मी ऐकले. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीवर मी छत्रपती संभाजी नगर शहर नाही तर औरंगाबाद म्हणणार आहे विधान केले. संजय राऊतांना विचारायचे आहे छत्रपती संभाजी नगरात बसून शरद पवारांना आव्हान देण्याची तुमच्यात हिम्मत आहे का? असा जळजळीत सवाल केला.

भाजपचे आमदार राम कदम यांनीही या वादात उडी घेत उद्धव ठाकरे यांची तुलना शोलेमधील जेलर अभिनेता असरानी यांच्याशी केली. “आधे इकडे जा, आधे तिकडे जा” असा संवाद असरानी यांनी शोलेमध्ये म्हटला. ठाकरे गटाची सध्या अवस्था तशीच झाली आहे. अर्धा इथे… अर्धा तिकडे… आणि मागे वळून पाहिलं तर कुणीच नाही. त्यांचे नेते संजय राऊत पंतप्रधानांबद्दल कोणते शब्द वापरत आहेत? मोदी यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी आहे असे राम कदम म्हणाले. संपूर्ण जग त्यांना जागतिक नेता म्हणून स्वीकारत आहे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांचे शब्द पहा. जनता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना या शब्दांची शिक्षा देईल असा इशाराही राम कदम यांनी दिला.