सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील कुडाळ निवजे येथील 80 वर्षीय आजी लक्ष्मी पालव यांनी आपल्या कुटुंबासह रांगणागड पायी चालत अवघ्या सव्वादोन तासात सर केला. सायंकाळी आजीबाई त्याच जोमाने गडावरून पुन्हा खाली उतरल्या. या वयातील मोठ्या जिद्दीने त्यांनी केलेला हा प्रवास थक्क करणारा आहे. (Sindhudurg laxmi palav trekking Ranganagad)
लक्ष्मी पालव यांच्या वारंग आणि पालव या दोन्ही कुटुंबातील नातवंडानी रांगणागडावर जायचा बेत आखला. त्यांच्या नियोजनात कुटुंबातील सर्वांनी मिळून गडावर एक दिवसाची सहल काढण्याचे निश्चित केले. नातवंड आणि पतवंडानी आपल्या आजीला सोबत गडावर येण्याचा आग्रह धरला. आजीनेही मोठ्या उत्साहाने होकार दिला.
आजी आपल्या सोबत येणार म्हणून नातवंडे, पतवंडे यांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. ठरलेल्या तारखेनुसार सकाळी आठ वाजता आपल्या तीन पिढ्यांच्या कुटुंबासमवेत शिवाजी महाराजांच्या जयघोषात लक्ष्मी आजींनी गडावर चढायला सुरुवात केली. त्यांचे एक एक पाऊल गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत होते. नातवंडे, पतवंडा सोबत वाटेतील एक वेगळा आनंद घेत लक्ष्मी आजींनी थकवा जाणवू न देता सव्वादोन तासात गड सर केला.
कुटुंबासोबत गडावर मौजमजा करीत त्या सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाल्या. दोन सव्वा दोन तासात त्यांनी पुन्हा गड उतरून या वयातही यशस्वी केलेली रांगणागडाची सफर सर्वानाच अचंबित करणारी आहे.
घावनळे गावचे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या लक्ष्मी पालव या आजी आहेत. पालव आजी यांची घरची शेती असून अजूनही त्या शेतात काम करायला जातात. या वयातही त्या निरोगी आहेत. त्यांचा हा प्रवास तरुणाईला लाजविणारा असाच आहे.
संबंधित बातम्या
अडीच वर्षाच्या चिमुकलीची उंच भरारी, प्रबळगड कलावंतीणीचा सुळका सर