Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या दुर्घटनेनंतर फरार असलेला प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे. तब्बल 11 दिवसांनी जयदीप आपटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता याप्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे. जयदीप आपटे हा सापडला असला तरी आता त्याचे कुटुंब गायब झालं आहे.
जयदीप आपटे यांच्या घराला पुन्हा टाळे लावलं आहे. त्यामुळे जयदीप आपटेच्या अटकेनंतर आता कुटुंब गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. जयदीप आपटेला अटक झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला मिळाली होती. यानंतर पहाटे चारच्या सुमारास आपटे कुटुंब घराला टाळा लावून पुन्हा गायब झाले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे यांचे कुटुंब सध्या सिंधुदुर्ग येथे असल्याचे बोललं जात आहे. त्याचे कुटुंबिय न्यायालयीन लढाई लढण्यासाठी वकिलांशी चर्चा करत आहे. आज जयदीप आपटे याला सिंधुदुर्ग न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यासाठी ते सिंधुदुर्ग येथे गेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
शिल्पकार जयदीप आपटे हा पुतळा कोसळल्यापासून 11 दिवस फरार होता. यामुळे पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. त्यानंतर काल रात्री उशिरा कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जयदीप आपटेला बेड्या ठोकल्या आहेत. जयदीप आपटे हा तोंडावर रुमाल बांधून अंधाराचा फायदा घेत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी कल्याणच्या घरी आला होता. त्याचवेळी घराबाहेर उभे असलेल्या बाजारपेठ पोलिसांनी जयदीपला बेड्या ठोकल्या. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे.