Chhatrapati Shivaji Maharaj Statue Jaydeep Apte Arrest : सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याप्रकरणी तब्बल ११ दिवस फरार असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला पकडण्यात पोलिसांना यश आलं. जयदीप आपटेला बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आता हा घटनाक्रम नेमका कसा घडला? याची माहिती समोर आली आहे.
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी जयदीप आपटेविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. तसेच मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे हा त्यांच्या हाती लागला नव्हता. पण बुधवारी जयदीप आपटे हा कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे हा कसाऱ्यावरुन लोकल ट्रेन पकडून कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करत दूध नाका परिसरात उतरला. जयदीपने कोणीही ओळखू नये यासाठी डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क आणि रुमाल गुंडाळला होता. यावेळी जयदीपच्या हातात दोन बॅगाही होत्या. जयदीप हा टोपी आणि मास्क लावून राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात होता.
पण इमारतीच्या गेटवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांकडून इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र तपासले जात होते. ते ओळखपत्र तपासूनच पोलीस रहिवाशांना इमारतीत सोडत असल्याचे त्याने लांबूनच पाहिलं. यानंतर जयदीप हा इमारतीजवळ आला. पोलिसांनी त्याच्याकडे आयडी कार्ड मागितले. पण त्याने नकार दिला. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याला त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेला जयदीप आपटे हा ढसाढसा रडायला लागला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर पोलीस घरात जाण्यासाठी पोलिसांना आग्रह करत होता. पण पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही.
जयदीप आपटेला ताब्यात घेतल्यानंतर इमारतीत लोकांची गर्दी जमली होती. जयदीप आपटेची आई आणि पत्नी या दोघीही इमारतीच्या खाली पोलिसांच्या गाडीपर्यंत आल्या. पोलिसांनी जयदीप आपटेला घरात न पाठवता थेट डीसीबी स्कॉडकडे नेले. सिंधुदुर्ग पोलीस जयदीप आपटेच्या मागावर होते. काही वेळातच डीसीपी कार्यालयमध्ये सिंधुदुर्ग पोलीस पोहोचले. त्यानंतर डीसीपी कार्यालयामध्ये जयदीप आपटेची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले.