Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली होती. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी असलेल्या चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी 30 ऑगस्टला पोलिसांनी बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्याला अटक करण्यात आली. यानंतर आज दुपारच्या सुमारास मालवण कोर्टात याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी चेतन पाटीलला कोर्टात हजर करण्यात आले. मालवण दिवाणी न्यायालयात ही सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील तुषार भनगे यांच्या न्यायलयात ही सुनावणी पार पडली.
तर आरोपी चेतन पाटील यांच्या वतीने वकिलांची फौज तयार ठेवण्यात आली होती. कोल्हापूरच्या चार वकिलांसह सिंधुदुर्ग कुडाळमधील एक वकील मालवण न्यायालयात हजर होते. ॲड तुषार शिंदे, ॲड सोनावले, ॲड अभिजीत हिरुगडे, ऍड कोमलराव राणे ॲड सुरेंद्र तेली हे वकील पत्र घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी जबरदस्त युक्तीवाद केला.
यावेळी मालवण दिवाणी न्यायालयात पोलिसांनी चेतन पाटीलला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली. आम्ही चेतन पाटीलला कोणतीही मारहाण केलेली नाही. पण त्याने हे काम केलं आहे, याचे पुरावे गोळे करायचे आहेत. चेतन पाटीलसोबत यात अन्य कोणी व्यक्ती सहभागी होत्या का? याचीही तपासणी करायची आहे. त्यामुळे त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली जावी, अशी मागणी पोलिसांनी केली.
हा पुतळा पडला तिथे पर्यटकांचा जीव गेला असता. त्यामुळे हे बांधकाम कशा पद्धतीने करण्यात आले, त्यापूर्वी पर्यावरणाचा अभ्यास केला होता का? याचीही माहिती घ्यायची आहे. त्यामुळे आरोपीला 10 दिवस पोलीस कोठडी द्या. आरोपी हा शिकलेला असून, त्याच्यासोबत आर्थिक देवाण घेवाण झाली का? याचीही चौकशी करायची आहे. तसेच त्याचा लॅपटॉपही जप्त करायचा आहे, असे पोलिसांनी यावेळी सांगितले.
यानंतर सरकारी वकिलांनी याप्रकरणी त्यांची बाजू कोर्टात मांडली. या घटनेत दोन मुख्य आरोपी आहेत. यातली 1 आरोपी हा फरार आहे. आरोपींनी कशाप्रकारे काम केले, त्यांच्यासोबत आणखी कोण होतं, यासाठी त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
चेतन पाटीलला केलेली अटक चुकीची, वकिलांची मागणी
यानंतर आरोपीच्या वकिलांनी चेतन पाटीलची बाजू कोर्टात मांडली. चेतन पाटीलला केलेली अटक चुकीची आहे. पुतळा कसा पडला याचे काहीही ठोस कारण पोलिसांकडे नाहीत. फक्त असं झालं या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे याबद्दल कोणताही पुरावा नाही. खोट्या माहितीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे., असे चेतन पाटीलचे वकील यांनी म्हटले.
चेतन पाटीललने बांधलेला चबुतरा पूर्णपणे व्यवस्थिती आहे. त्याच्याकडे फक्त चबुतरा बांधणे एवढेच काम होते आणि तो चबुतराही नीट आहे. त्याचा पुतळा पडावे असा हेतू नव्हता. वर्क ऑर्डर का नाही, पुतळा का पडला याचे उत्तर शोधावे लागले. यासाठी कुठलाही एक्सपोर्ट अहवाल तयार करण्यात आलेला नाही. फक्त PWD सर्व कागद जमा आहेत. यासाठी वापरण्यात आलेले सर्व धातू गंजले होते का? याबद्दलही काहीही माहिती नाही. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कसे झाले, याबद्दल फक्त मेल केला, अजून काहीही केलेले नाही. त्यामुळे पोलीस कोठडची केलेल्या मागणीची गरज नाही, असे चेतन पाटीलच्या वकिलांनी सांगितले.