विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार आता सुरु झाला आहे. सिंधुदुर्गमधील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर वैभव नाईकांनी टीकास्त्र डागलं आहे. निलेश राणे हा नारायण राणेंचा मुलगा आहे. त्यामुळे त्यांना सरस वाटतोय. खासदार असताना त्यांच्या मुलाने काय दिवे लावले? दुसऱ्याचं ते कारटं आणि आपला तो बाबू अशी राणेंना नेहमीच सवय आहे, असं वैभव नाईक म्हणाले. कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे अशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना उद्धव ठाकरे यांच्याबाबत आत्मियता आहे. याला येऊ देणार नाही त्याला येऊ देणार नाही. हीच राणेंची प्रवृत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. तेव्हा राणेंचे तोंड धरले होते काय? राणेंना लाज वाटायला पाहिजे. आपण एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात, दुसरा मुलगा दुसऱ्या पक्षात आहे. राणे हे आता आपल्या परिवारा पुरतेच असल्याने त्यांना उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही, असं वैभव नाईक म्हणालेत.
नारायण राणेंच्या मागे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आता राहणार नाही. राणेंचे चॅलेंज आम्ही वारंवार स्वीकारलं आहे. राजकोट किल्ल्यावरून आदित्य ठाकरेंना बाहेर न येऊ द्यायचे चॅलेंज स्वीकारलं होतं. राणे आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. कारण घराणेशाही विरोधात सिंधुदुर्गातील जनतेचा आता उद्रेक झाला आहे. राणेंचे चॅलेंज आम्ही कायम स्वीकारत असतो आणि उद्या ही स्वीकारू…, असं खुलं आव्हान वैभव नाईक यांनी राणेंना दिलं आहे.
मी काहीतरी काम केलंय म्हणूनच तुम्हाला दारोदारी फिरावं लागतंय. सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व मी करतोय. त्यामुळे माझाच विजय होणार आहे. कोरोना काळात तुम्ही कुठे होता? येणाऱ्या निवडणुकांनंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, एवढं निश्चित आहे. कुडाळ- मालवण या विधानसभा मतदारसंघातून मी दोनवेळा निवडून आलोय. यावेळी देखील माझाच विजय निश्चित आहे, असा विश्वासही वैभव नाईकांनी व्यक्त केला आहे.