बीड: महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही आमदार नाराज आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी खुली ऑफर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी आघाडीतील आमदारांना दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीमध्ये एकही आमदार नाराज नाही. केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी असं का बोलावं हे त्यांनाच माहीत. ते पुड्या सोडण्याचे काम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे, अशी टीका राज्यमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी केली. तसेच एमआयएमला सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवारच घेतील. मात्र आमचे तीन चाकं मजबूत आहेत. चौथ्या चाकाची आम्हाला गरज नाही. सध्या शिवसेनेला तरी एमआयएमची गरज नाही, असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं. बीड येथे जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता सत्तार यांनी हे विधान केलं.
खासदार इम्तियाज जलील हे आमच्या जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. शिवसेना प्रमुख योग्य निर्णय घेतील. जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर दिली आहे, सेनेकडे नाही. संजय राऊत हे आमचे नेते आहेत. ते जे बोलतात ते योग्य बोलतात. आमच्या तीन चाकाकडे 173 आमदार आहेत. सध्या आम्हाला चार चाकांची गरज नाही. जलील यांनी उद्धव ठाकरे साहेबांना भेटावं. यावर तेच निर्णय घेतील. एमआयएमच्या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याचं काम हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं आहे. त्या दोघांचा निर्णय तीनही पक्षांना मान्य राहील. सध्या शिवसेनेला एमआयएमची गरज नाही, असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारचा एकही आमदार फुटत नाही. त्यांचा तो चकवा आहे, असंही ते म्हणाले.
मी पुन्हा येईन असं म्हणनार नाही, कर्तबगार लोक निवडून येतातच, असं अब्दुल सत्तार म्हणाले. शिवसेनेत जाता जाता मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घेतला. मी भाजपमध्ये जाणार होतो, मात्र शिवसेनेत आलो. सत्तार नावातील र काढल्यास सत्ता होईल. कधी कधी राजकारणात मॅच फिक्सिंग करावी लागते, असं सत्तार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
संबंधित बातम्या:
MIMला आघाडीत घ्यायचं की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील, राजेश टोपेंच्या विधानाने शिवसेनेची कोंडी?
Aurangabad | नाराज आमदारांना भाजपची खुली Offer, औरंगाबादेत Dr. Bhagwat Karad यांचं वक्तव्य!