राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यादरम्यान गेले असताना त्यांचे निधन झाले. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी गेले होते. यानंतर ते प्रयागराजच्या नदीत शाही स्नान करण्यासाठी गेले होते. या नदीमध्ये स्नान केल्यानंतर महेश कोठे बाहेर पडले. त्यानंतर नदीतून बाहेर येताच त्यांना थंडी जाणवू लागली आणि काही वेळाने त्यांचे शरीरातील रक्त गोठले. यानंतर त्यांन हृदयविकाराचा जोरदार झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं वयाच्या ५५ वर्षी निधन झाल्याने संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान महेश कोठे हे यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र यात त्याचा पराभव झाला. ते सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे नेतृत्व होते. महेश कोठे यांनी सोलापूर महापालिकेचे महापौर विरोधी पक्ष नेते म्हणून काम पहिले होते. तसेच सभागृह नेते म्हणून त्यांनी विविध जबाबदारी पार पाडली होती. अशातच महेश कोठे यांचा राजकारणात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात प्रवास राहिला.
महेश कोठे यांनी २०२१ मध्ये शिवसेना पक्षाला निरोप देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यानंतर कालांतराने राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
महेश कोठे यांनी चार ते पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती पण त्या प्रत्येक वेळेस अपयशाला सामोरे जावे लागले होते. मात्र, महापालिकेच्या राजकारणात त्यांचं वर्चस्व होतं. महेश होणे याचे पुतणे देवेंद्र कोठे हे सध्या आमदार आहेत. महेश कोठे यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरात १४ ते १५ नगरसेवक निवडून यायचे.
महेश कोठे हे सोलापर महापालिकेच सर्वात तरुण महापौर होते. शिवसेना सोडून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी ते सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते देखील होते.