सोलापूर | अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांचा आज सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जाहीर निषेध (Protest) करण्यात आला. गुणरत्न सदावर्ते हे कायदेतज्ज्ञ आहेत की माथेफिरू, असा सवाल करण्यात आलाय. राज्यभरात सुरु असलेल्या जुन्या पेंशनसाठीच्या आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांनी आज एंट्री घेतली. राज्य शासनाचे कर्मचारी यांची मागणी रास्त असू शकते, मात्र अशा प्रकारे सर्वच अत्यावश्यक सेवा ठप्प करत आंदोलन करणे योग्य नाही. याविरोधात सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सदावर्ते यांची याचिका हायकोर्टाने स्वीकारली असून यावर उद्याच सुनावणी होणार आहे. सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतल्याने आंदोलन शमतं की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच राज्यभरातून सदावर्ते यांचा निषेध करण्यात येत आहे.
अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून संपाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. या विरोधात सोलापूरच्या माढ्यात सदावर्ते यांचा निषेध करण्यात आला. जुनी पेन्शनधारक कर्मचाऱ्यांकडून सदावर्ते विरोधात घोषणाबाजी व बोंबा बोब आंदोलन करुन निषेध करण्यात आला.अॅड.सदावर्ते कायदेतज्ञ आहेत की माथेफिरु याचे संशोधन सरकारने करण्याची गरज निर्माण झाल्याचे जुन्या पेन्शन धारकांकडून सांगण्यात आले.
सोलापुरात जुन्या पेंशनसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलकांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासकीय रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ आंदोलनात सहभागी आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. सोलापूर शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेल्याने 50 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आपल्या रुग्णाला एका वॉर्डातून दुसऱ्या वार्डात घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनाच कसरत करावी लागत आहे. संपामुळे कर्मचारी कोणत्याही प्रकारची सेवा देत नाहीयेत. पेशंटला स्वतः घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने लवकर तोडगा काढावा, रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामान्यांकडून करण्यात येत आहे.