आदिनाथ कारखाना ‘बारामती अॅग्रो’च चालविणार; बंद पाडण्यासाठी राजकारण; आमदार रोहित पवार

| Updated on: May 23, 2022 | 9:38 PM

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयास विद्यमान अध्यक्षांकडून डीआरटी न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्यामुळे कारखान्याबाबत तालुक्यात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रोच चालविणार; बंद पाडण्यासाठी राजकारण; आमदार रोहित पवार
Image Credit source: twitter
Follow us on

सोलापूरः कितीही अडथळे आले तरी आदिनाथ ‘बारामती ॲग्रो’च (Baramati Agro) सुरू करणार व्यक्तीगत स्वार्थासाठी कोणी काहीही केले आणि करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखाना (Adinath Sugar Factory) ‘बारामती ॲग्रो’ला चालवण्यासाठी कितीही आडकाठी आणली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ‘बारामती ॲग्रो’च आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करणार असल्याचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी स्पष्ट केले.

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयास विद्यमान अध्यक्षांकडून डीआरटी न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्यामुळे कारखान्याबाबत तालुक्यात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, व्यक्तीगत स्वार्थासाठी कोणी कितीही अडथळे आणले तरी आदिनाथ कारखाना ‘बारामती ॲग्रो’च सुरू करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

ना हरकत प्रमाणपत्र मिळणार

या कारखान्यावर दिल्लीस्थित ‘एनसीडीसी’ बँकेकडून पाच वर्षांपूर्वी घेतलेले 25 कोटी रुपये कर्ज आज 50 कोटी रुपये झाले आहे. त्यांच्या कर्जाच्या परतफेडीबाबत कायदेशीर मार्ग निघाल्यानंतर कारखाना चालवण्यासाठी त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे.

सर्वसाधारण सभेची मान्यता

याबाबतच्या प्रक्रियेमध्येच सुमारे दोन वर्षे गेली. या बारीक-सारीक बाबी सभासदांना माहित नसतात. नियमानुसार श्री आदिनाथ कारखाना राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला चालवावयास मिळाला, तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव मंजूर केला आणि त्याला सर्वसाधारण सभेची मान्यताही घेतल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

राजकारण करण्याचा प्रकार

कारखान्यात वेगवेगळ्या नावाने समित्या स्थापन करणे, त्यांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रकार सुरु आहे. कारखाना भाडेतत्वावर घेतल्यानंतरही तो सुरू न करणं हे कोणत्याही कंपनीच्या आर्थिक धोरणात बसत नसते. बारामती ॲग्रो कंपनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असून कारखाना सुरू करण्यामागील मूलभूत कारण लक्षात घेतले पाहिजे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून काही मंडळी सभासदांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. हा कारखाना सुरू न होण्यात काही मंडळींचा व्यक्तिगत स्वार्थ दिसतो आणि या स्वार्थापायीच जाणीवपूर्वक कायदेशीर किंवा सभासदांच्या आडून अडथळे आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असावा. परंतु कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले.