अकलूज : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. सेलिब्रिटींसह अनेकांच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसतेय. अकलूजमधल्या (Akluj Viral Wedding) एका लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. एक तरूणाने चक्क दोन मुलींशी एकाच मांडवात लग्नगाठ बांधलीये. अतुल अवताडे या तरूणाने रिंकी आणि पिंकी पाडगावकर (Rinki Padgoankar Pinki Padgoankar and Atul Awtade) या दोन जुळ्या बहिणींसोबत सप्तपदी घेतली. त्यांच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.
अतुल अवताडे आणि रिंकी-पिंकी पाडगावकर यांनी पै-पाव्हण्यांच्या उपस्थितीत साता जन्माच्या साथीच्या आणाभाका घेतल्या. वैवाहिक सुखाचे दिवस त्यांची वाट पाहात होते. अशातच त्यांच्या आनंदावर तक्रारीचं विरजण पडलंय. कारण या लग्नानंतर अतुलच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. एकाच मांडवात जुळ्या बहिणींशी केलेला विवाह नवरदेवाच्या अंगलट आलाय. अतुलच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल झाला आहे.
अतुल अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर 2 मध्ये राहणाऱ्या तरुणाने 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी पाडगावकर आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला.पण त्यांचा हा आनंद दोन दिवसही टिकला नाही. अतुल विरोधात तक्रार करण्यात आली आहे.माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणी आहेत. त्यामुळे त्या एकमेकींसोबत लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. दोघींनी एकत्रच इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्या दोघी कायम एकमेकींसोबत असतात. इथून पुढेही त्यांना एकमेकींसोबत राहायची इच्छा आहे. त्यामुळे त्या दोघींनीही एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांआधी त्यांची अतुलसोबत ओळख झाली. त्यानेही या लग्नाला होकार दिला. अन् 2 डिसेंबरला या तिघांचा विवाह सोहळा पार पडला.
अतुल रिंकी आणि पिंकी यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. त्यांच्या विवाहाचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यांच्या लग्नावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.