शिवसेनेत उभी फूट, आता पुढचं मिशन राष्ट्रवादी? भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य

| Updated on: Feb 25, 2023 | 6:59 PM

शिवसेनेत फूट पडल्याची ही ताजी घटना असताना आता भाजप खासदाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा इशारा दिला आहे. आगामी 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात राहणार नाही, असं मोठं वक्तव्य भाजप खासदाराने केलं आहे.

शिवसेनेत उभी फूट, आता पुढचं मिशन राष्ट्रवादी? भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडलेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला असलेला पाठिंबा काढलेला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्तांतर घडवून आणलं. या घडामोडी घडून आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटलं आहे. एकनाथ शिंदे हेच आता शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा निकाल दिला आहे. शिवसेनेत फूट पडल्याची ही ताजी घटना असताना आता भाजप खासदाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा इशारा दिला आहे.

आगामी 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात राहणार नाही, असं मोठं वक्तव्य भाजप खासदाराने केलं आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबतचं मोठं वक्तव्य केलं आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर नेमकं काय म्हणाले?

खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. या बॅनरबाजीवर रणजितसिंह निंबाळकर यांनी टीका केली. “महाराष्ट्रात मुंगेरी लाल के सपने बघणारे बरेच लोक आहेत. राजकीय स्वप्न बघणं हा काही गुन्हा नाही. मात्र 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षच अस्वित्वात राहणार नाही”, असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

रणजितसिंह यांची ठाकरे गटावरही टीका

रणजितसिंह यांनी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली नाही, तर त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला. “ठाकरे गटाला रस्त्यावर उतरुन काम करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ठाकरे गटाचे काम पक्ष वाढीचं सुरु नसून अस्वित्व दाखवण्याचे सुरु आहे”, असं निंबाळकर म्हणाले.”एखाद्या शहाण्या माणसाबद्दल प्रश्न विचारला असता तर प्रतिक्रिया देता आली असती. संजय राऊतांवर काय बोलावं?”, अशीदेखील टीका त्यांनी केली.

रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटपाच्या केलेल्या आरोपांवरही रणजितसिंह यांनी प्रतिक्रिया दिली. “पोटनिवडणुकीत भाजपानै पैसे वाटल्याचा केलेला आरोप निव्वळ राजकीय स्टंट आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे.दोन्ही मतदार संघात नक्कीच कमळ फुलणार आहे”, असंही ते म्हणाले.

“भाजपात येणाऱ्या इच्छुकांविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेच अंतिम निर्णय घेतील”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.